बदली

Tuesday, 23 August 2022

वाक्प्रचार आणि रूढी

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 वाक्प्रचार आणि रूढी


श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या ‘डोह’ या पुस्तकात एक वाक्य आहे : ‘पंक्तिप्रपंच केल्याने वाघळाच्या जन्माला गेलेली ती गेल्या जन्मीची माणसे आहेत, असे थोरली आई सांगे..’


‘पंक्तिप्रपंच करणे’ म्हणजे एकाच पंक्तीत जेवायला बसलेल्या लोकांपैकी एकास एक दुसऱ्यास दुसरा, एकास कमी दुसऱ्यास जास्त पदार्थ हेतुपूर्वक वाढून भेदभाव करणे. दाते- कर्वे यांच्या ‘महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोशात’ पंक्तीस प्रपंच करू नये, असे स्पष्ट म्हटले आहे. तरीही कोशात या वाक्प्रचाराची नोंद आहे, याचा अर्थ तसे वर्तन घडत असावे. आज आपण ज्या समतादी मूल्यांची कास धरतो, त्या सामाजिक संक्रमणाच्या प्रवासात अडथळे ठरणाऱ्या प्रवृत्तींची कल्पना अशा वाक्प्रचारांतून येते.


आणखी एक वाक्प्रचार वाचताना मनाला वेदना होतात; तो म्हणजे ‘वाळीत टाकणे’. याचा अर्थ आहे, जात/ समुदाय यातून बहिष्कृत करणे. जात अथवा समुदाय यांचे निर्बंध पालन न केल्यास ही शिक्षा दिली जात असे. वाळीत टाकणे, हे एकेकाळी समाजनियंत्रणाचे कठोर साधन मानले जात असे. संत ज्ञानेश्वर यांचे वडील विठ्ठलपंत यांनी संन्यासाचा त्याग करून गृहस्थाश्रम स्वीकारला होता, म्हणून त्यांच्या कुटुंबाला त्याकाळी वाळीत टाकले होते; हे आपणास माहीत असते. आपल्याकडे, तसेच इतरत्रही किती विविध कारणांनी व्यक्ती अथवा गट यांना वाळीत टाकले गेले होते; याची उदाहरणे सु. र. देशपांडे यांनी ‘मराठी विश्वकोशा’त दिली आहेत. वाळीत टाकणे, हा आता कायद्याने गुन्हा आहे. तरीही एखाद्या व्यक्तीला वाळीत टाकण्यात आल्याची बातमी अधूनमधून कानी पडते. याचा अर्थ असा की हे कालबाह्य झालेले वाक्प्रचार समाजमनातून पूर्णपणे पुसले गेलेले नाहीत. त्यासाठी अजूनही समाज- प्रबोधनाची गरज आहे. असे आणखीही वाक्प्रचार सहज आठवतील.


आपल्या प्रगतीच्या वाटेवर सिंहावलोकन करताना अशा वाक्प्रचारांचीही दखल घ्यावी लागते. कारण हे वाक्प्रचार म्हणजे रूढींचे दर्शन घडवणारे, एकेकाळच्या समाजवास्तवाचे भाषेत गोठलेले अवशेष असतात. आपल्या आधुनिकतेच्या वाटेवरची आव्हाने त्यातून लक्षात येतात.


🖊 डॉ. नीलिमा गुंडी

nmgundi@gmail.com

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

दिनांक- २४ ऑगस्ट २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...