भाषासूत्र, दै.लोकसत्ता
🎯 सांगा- सांगी वडाला वांगी
माणसाचा एक जन्मजात स्वभाव असतो, की ऐकलेली गोष्ट सहसा तिखटमीठ लावल्याशिवाय ओठातून बाहेर येत नाही. याच स्वभावविशेषावर आधारित एक खेळही आपण लहानपणी खेळायचो. खूपच मजा यायची. तो खेळ म्हणजे ‘कानगोष्टी.’ जे ऐकले आहे ते शक्य आहे की नाही याचा विचार न करता दुसऱ्याच्या कानात सागूंनही टाकायचो. मग शेवटचा मुलगा त्याने ऐकलेले वाक्य सर्वाना मोठय़ाने सांगायचा. तुम्हाला आठवला असेल ना हा खेळ!
एकदा आम्हीही हा खेळ खेळला होता. त्यात पहिल्या मुलाने सांगितले होते की, ‘‘काल आम्ही सिनेमा बघायला गेलो होतो. बरोबर शंकर होता. खूप मजा आली.’’ ते वाक्य ओळीने सर्वाच्या कानात सांगितले गेले.
शेवटच्या मुलाने जे सांगितले ते असे, ‘‘काल आम्ही सिनेमा करायला गेलो होतो. बरोबर उंदीर होता. खूपच मजा आली.’’ म्हणजे ‘बघायला’च्या ऐवजी ‘करायला’ किंवा ‘शंकर’च्या ऐवजी ‘उंदीर’ हा शब्द त्याला ऐकायला आला.
कधी कधी अतिशयोक्त सांगण्याचा स्वभावही उफाळून येतो आणि सरस आणि सुंदर सांगण्याच्या स्वभावातून ‘कानगोष्टी’चा खेळ रंगतो. एकदा एकाने पहिल्या खेळाडूच्या कानात सांगितले, ‘‘अहो ! काय आश्चर्य ! सांगो वांगी नाही, खरंच आमच्या शेतात कणसंच कणसं उगवली आहेत.’’ आणि शेवटच्या खेळाडूने त्याने ऐकलेली ‘कानगोष्ट’ मोठय़ाने सांगितली, ‘‘अहो ! महद आश्चर्य ! फक्त वांगीच नाहीत, खरंच आमच्या शेतात माणसंच माणसं उगवली आहेत.’’ आणि ऐकणारे लोकही असे बहाद्दर की हा भूमातेचा चमत्कार असेल, असे समजून क्षणभर अवाक् झाले.
एखादी घटना तिखटमीठ लावून सांगितली जाते आणि सांगा-सांगीत आपण वडाच्या झाडाला वांगी लावून मोकळे होतो. असे पानशेतच्या पुराच्या वेळी झाले होते. दुसऱ्या दिवशी अफवांमुळे पुण्यात जास्त हाहाकार माजला होता.
🖊 माधवी वैद्य
madhavivaidya@ymail.com
==============
संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव
दिनांक- १९ जुलै २०२२
No comments:
Post a Comment