बदली

Sunday, 31 July 2022

गाणे सुरात गावे, तसे भाषासौंदर्य व्याकरणात जपावे....

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 गाणे सुरात गावे, तसे भाषासौंदर्य व्याकरणात जपावे....


आज मराठी भाषा बोलणाऱ्या सुशिक्षितांच्या वाक्यांत होणारे काही अपप्रयोग आपण विचारात घेणार आहोत. असे प्रयोग केव्हा केव्हा लिखाणातही आढळतात. हे वाक्य वाचा – तो म्हणाला, ‘मी काल संध्याकाळी तुझ्या घरी आलेलो, पण तू घरी नव्हतास.’


अशीच एक चुकीची वाक्यरचना- ती मला म्हणाली, ‘मी तुझ्याबरोबर चार दिवसांपूर्वी मैत्रिणीकडे गेलेली, तू कशी विसरलीस?’ पुढील वाक्यांत थोडी वेगळी, पण चुकीचीच वाक्यरचना अनेकदा आपल्या कानावर पडते. वाचायलाही मिळते.-

ती म्हणाली, ‘काल संध्याकाळी कितीतरी वेळ दारातच मी विचार करत बसली होती.’ किंवा ‘मी काल नाटक पाहायला गेली होती.’ या सर्व वाक्यांत क्रियापदाची रूपे आहेत- ‘(मी) आलेलो,’ ‘मी गेलेली,’ ‘मी बसली होती,’ ‘मी गेली होती.’ धातू आहेत- येणे+हो, जाणे+हो, बसणे+हो- यांची बिनचूक रूपे आहेत. (पु.) मी आलो होतो, मी गेले होते, मी बसले होते, मी गेले होते.- ही भूतकाळी रूपे आहेत.


वरील वाक्यांतील अधोरेखित शब्द हे अपप्रयोग आहेत. योग्य रूपे आहेत- ‘मी आलो होतो,’ ‘मी गेले होते,’ ‘मी बसले होते’ आणि ‘मी गेले होते.’ आलेलो, गेलेली, ‘मी बसली होती’, ‘गेली होती’ अशी क्रियापदाची रूपे होत नाहीत. अनेकदा भाषेच्या योग्य स्वरूपाकडे आपले दुर्लक्ष होते. त्यामुळे भाषेत उपलब्ध नसलेली अशी चुकीचे रूपे आपण बेधडक योजतो.


आणखी एक अपप्रयोग ऐकायला मिळाला- ‘‘तो त्याच्या मित्राला म्हणाला, ‘तू ते मला आवडणारे गाणे बोल ना. तू गाणे छान बोलतोस.’’ या वाक्यांत ‘गाणे बोलणे’ हा चुकीचा प्रयोग आहे. रुढ शब्द- गाणे – गा किंवा गाणे- म्हण, गाणे- गातोस अशी क्रियापदे योजणे इष्ट आहे. मराठीत मान्य नसलेले असे चुकीचे प्रयोग मराठी भाषकांनी प्रयत्नपूर्वक टाळावेत. मराठी भाषेचे सौंदर्य जोपासणे, तिचे रक्षण करणे, अपप्रयोग टाळणे हे आपले कर्तव्य आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.


🖊यास्मिन शेख

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

 दिनांक- १ ऑगस्ट २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...