भाषासूत्र, दै.लोकसत्ता
🎯 चहा, कॉफी आणि कोको
‘चहा’ म्हणजे अस्सल मराठी आणि ‘टी’ इंग्रजी असे आपण मानतो. प्रत्यक्षात हे दोन्ही शब्द चायनीज आहेत! चिनी मँडरिन लिपीत चहा शब्द ज्या चिन्हाने व्यक्त होतो त्या चिन्हाचा उच्चार ‘चा’ असा होतो, पण अन्य काही चायनीज लिपींमध्ये त्याचा उच्चार ‘टे’ असा होतो. चीनच्या राजधानीला पूर्वी पेकिंग म्हणत पण आता बीजिंग म्हणतात तसाच काहीसा हा उच्चारभेद. पुढे इंग्लिश व्यापाऱ्यांनी चहा जगभर नेला. काही देशांत त्याचा उच्चार ‘टे’ असा तर काही देशांत ‘चा’ असा केला गेला. इंग्लंडमध्ये पुढे ‘टे’चा उच्चार ‘टी’ झाला, पण अनेक युरोपीय देशांत अजूनही ‘टे’ हेच रूप आहे.
सतीची प्रथा ज्याने बंद केली त्याच लॉर्ड बेंन्टिकने भारतात १८३४ मध्ये चहाची लागवड सुरू केली. भारतात त्यासाठी ‘चा’ हे रूप रूढ झाले. पुढे त्याचेच चा, चहा, चाय असे उच्चारभेद रूढ झाले. रशियामध्ये त्याला ‘चा’ असेच म्हणतात. अर्थात नावाची व्युत्पत्ती किंवा उच्चार काहीही असो, बहुतेकांचा दिवस सुरू होतो चहाच्या कपानेच!
कॉफी अॅबिसिनिया (आताच्या इथिओपिया) देशातील काफ्फा नावाच्या गावातील. भारतात सोळाव्या शतकात मक्केहून यात्रा करून परतणाऱ्या बाबा बुदान नावाच्या मुस्लीम फकिराने कॉफीच्या बिया प्रथम कर्नाटकात आणल्या. पुढे कॉफी भारतभर पसरली. अरबी व्यापाऱ्यांनी सोळाव्या शतकातच कॉफी युरोपात नेली. पुढे स्टारबक्स आणि नेसले यांनी कॉफी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय पेय बनवले. कोको हा प्रकार दक्षिण अमेरिकेतल्या अॅझटेक संस्कृतीतून आला. ‘काकाओ’ हे त्याचे मूळ नाव. कोकोच्या बिया दळून, त्यात पाणी घालून तयार होणारे एक फेसाळ पेय तिथे आवडीने पीत. मेक्सिकन भाषेत त्याला ‘चॉकोअट्ल’ म्हणत; ‘चॉको’ म्हणजे फेस आणि ‘अट्ल’ म्हणजे पाणी. ‘चॉकोअट्ल’चे स्पॅनिश लोकांनी ‘चॉकोलेट’ केले. जॉन कॅडबरी यांनी १८२४ साली ब्रिटनमध्ये याच बियांचे घट्ट तेल काढून (कोको बटर), त्यात दूध व साखर घालून, त्या मिश्रणाच्या वडय़ा आजच्या चॉकलेट स्वरूपात तयार केल्या. चॉकलेट जगभर नेण्याचे श्रेय त्यांचे. त्याच कंपनीने पुढे मूळच्या पेयाच्या स्वरूपात ‘ड्रिंकिंग चॉकलेट’ सुरू करून एक वर्तुळ पूर्ण केले.
🖊 भानू काळे
bhanukale@gmail. com
==============
संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव
दिनांक-२९ जुलै २०२२
No comments:
Post a Comment