भाषासूत्र, दै.लोकसत्ता
🎯 वाक्प्रचारांमधील ग्रामीण संदर्भविश्व
मराठी भाषा ही शतकानुशतके गावपातळीवरील लोकांच्या तोंडी रुळलेली भाषा आहे. त्यामुळे अनेक वाक्प्रचारांमधून लोकजीवनातील संदर्भविश्व उलगडत जाते. ‘रामप्रहर’ हा वाक्प्रचार ग्रामीण भागात वापरला जातो. त्याचा बोलीभाषेतील उच्चार ‘रामाच्या पारी’ असा होतो. रामप्रहर म्हणजे सूर्योदयापासून पहिले तीन तास म्हणजेच प्रात:कालचा प्रहर होय. (दिवस २४ तासांचा म्हणजेच आठ प्रहरांचा असतो.) हा प्रहर पवित्र मानला जातो. जगदीश खेबुडकर यांच्या गीतात या प्रहराचे वर्णन आहे, ते असे : ‘उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी’
‘ससा भानवसी येणे’ हा एक वाक्प्रचार जुन्या काळात प्रचलित होता. भानवसा/ भानोसा म्हणजे चुलीच्या मागचा ओटा. हा ग्रामीण भागात वापरला जाणारा शब्द आहे. ससा चुलीच्या मागे सापडणे म्हणजे भक्ष्य आयते तावडीत सापडणे. या वाक्प्रचारातील अलंकरण लक्ष वेधून घेते. याचा भावार्थ आहे, घरबसल्या प्राप्ती होणे. ‘भाऊसाहेबांची बखर’ मध्ये हा वाक्प्रचार वापरला आहे.
‘वेठीस धरणे’ हा वाक्प्रचार शेतमजुरांवर एकेकाळी होणाऱ्या अन्यायाची आठवण करून देतो. वेठ म्हणजे रोख मेहनतान्यावाचून करावे लागणारे काम. त्यातून हा वाक्प्रचार रूढ झाला. त्याचा अर्थ, एखाद्याला आपले काम करण्यासाठी भाग पाडणे. ‘आली भेटीला नि धरली वेठीला’ ही म्हणही रूढ आहे.
‘गेला बाजार’ हाही अस्सल ग्रामीण वाक्प्रचार आहे. आठवडय़ाचा बाजार भरणे, ही खेडय़ातील पद्धत असते. अशा बाजारात, बाजार उठायची वेळ झाल्यावर येणाऱ्या मालाला कमी भाव मिळतो. त्यामुळे ‘गेला बाजार (तरी)’ याचा अर्थ ‘कमीत कमी’ असा रूढ झाला आहे.
उखळ आणि मुसळ ही धान्य कांडण्याची साधने असतात. धान्य कुटल्यानंतर उखळ पांढरे होते. त्यामुळे ‘उखळ पांढरे होणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, समृद्धी येणे. हा वाक्प्रचार निंदाव्यंजक रूपात वापरला जातो. उदा. शेतकऱ्यांना मिळालेल्या सवलती लाटून स्वत:चे उखळ पांढरे करून घेणारेही काही जण असतात. एकंदरीत ग्रामीण जीवनव्यवहार असा वाक्प्रचारांमध्ये गोंदला गेला आहे.
🖊डॉ. नीलिमा गुंडी
nmgundi@gmail.com
==============
संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव
दिनांक- १५ जून २०२२
No comments:
Post a Comment