बदली

Monday, 13 June 2022

वेठीच्या घोडय़ास तरवडीचा फोक

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 वेठीच्या घोडय़ास तरवडीचा फोक


वेठ म्हणजे रोख मजुरी न देता गरिबाकडून काम करून घेणे. किंवा पैसे न देता एखादा जिन्नस सहज उपलब्ध होणे. पूर्वी खोत, पाटील किंवा गावचे कुलकर्णी यांच्याकडे या प्रकारचा अधिकार होता.


वेठीचा घोडा म्हणजे फुकटात, काही किंमत न देता काही कामापुरता आणलेला घोडा. फुकटात मिळालेल्या कोणत्याही गोष्टीचे अपरूप नसते. त्याची खरी किंमत कळत नाही. मग तिचा वापर करताना बेपर्वाई होते. फोक म्हणजे जरा जाडसर आकाराची झाडाची ओली फांदी. ‘फुकटात मिळालेल्या वेठीच्या घोडय़ाला मारण्यासाठी तो तरवडीच्या फोकाने (फांदीने) मारायलाही कमी करत नाही.’ कारण फुकट मिळालेल्या वस्तूच्या वापराविषयी जागरूक नसणे, हा मनुष्य स्वभाव आहे, असतो.


तरवड ही माळरानावर सहज आणि विपुल प्रमाणात उपलब्ध असणारी औषधी वनस्पती आहे. ती चटकन विनासायास हाताशी उपलब्ध होते. सहज फुकट मिळालेल्या घोडय़ाला मारण्यासाठी तशीच सहज उपलब्ध होणारी फांदीच पाहिजे नाही का? एखादी वस्तू स्वत:च्या खिशास जरा तोशीस पडून जर आणली तर तिची जपणूक, देखभाल माणसाकडून आस्थेने केली जाते, एरवी नाही, हा या म्हणीचा आशय आहे.


आता हेच बघा ना! रमेशला त्याच्या काकांनी एक जमिनीचा तुकडा भेट म्हणून दिला. पण त्याने तिची निगा राखली नाही. कारण ही जमीन त्याला अगदी फुकटात मिळालेली होती. त्याच्या काकांनी मात्र ही जमीन घेण्यासाठी जीवाचा खूप आटापिटा केलेला होता.

जमिनीचा तो अनमोल तुकडा आपल्या पुतण्याच्या हाती त्यांनी विश्वासाने दिला होता. पण त्याने त्याची बूज ठेवली नाही. त्याच्या काकांनी आणि काकूंनी जेव्हा ती जमीन बघितली तेव्हा त्याची काकू चिडून म्हणाली, ‘‘तरी मी म्हणत होते, इतक्या सहजपणे अशी देऊ नका जमीन तुम्ही त्याला. त्याची किंमत त्याला काय कळणार? अहो, ‘वेठीच्या घोडय़ास तरवडीचा फोक!’ हेच खरं असतं.’’


🖊 डॉ. माधवी वैद्य

madhavivaidya@ymail.com

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

दिनांक- १४ जून २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...