*भाषासूत्र, दै.लोकसत्ता*
🎯 *काजल्याला फळे आणि दुबळय़ाला बाळे..*
काजला म्हणजे कुचला..
हा कोकणात आढळणारा वृक्ष आहे. हा वृक्ष तसा निरुपयोगी असतो कारण त्याची फळे खूप कडू असतात. त्यामुळे भरपूर फळे येऊनसुद्धा ती फळे आणि ते झाडही दुर्लक्षितच राहते..
माझ्या घराजवळ एक नवीन बांधकाम सुरू झाले होते. तिथे एक रखवालदार रुजू झाला. एकटाच होता. तसा गरीब, प्रामाणिक होता.
त्याला सहजच विचारले, ‘‘तुझी घरवाली कुठे आहे ?’’
त्याने संकोचतच उत्तर दिले, ‘‘बाईजी। ती गावीच आहे. बच्चा पैदा होनेवाला है।’’
त्याला विचारले, ‘‘अरे वा ! नयी नयी शादी हुई लगती है तुम्हारी, पहेला बच्चा होगा ना? आप क्यूं नहीं ठहरे उस के साथ?’’
तो म्हणाला, ‘‘बाईजी । पहला कहाँ.. ये तीसरा है। उससे पहलेवाले दो है। छोटी उमर में शादी हुई..। फिर हर साल एकेक बच्चा पैदा हुआ। अब सोच रहा हूँ, इन लोगों का पालन करना मुझसे कैसा होगा। मैं कर सकूंगा की नहीं, एक वो भगवानही जाने।’’
मलाही असेच वाटले, याच्याजवळ ना शिक्षण, ना पैसा, याला ना कोणी मदत करणारे? काय करणार हा?
किती लोक असे असतील! ज्यांच्या जवळ ज्ञान नाही, अज्ञानाचा अंधार असेल! ना स्वत:चा विचार, ना बायकोचा विचार, ना मुलांचा! ही मुलं जन्माला घातली खरी पण यांचे पालनपोषण? त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, जीवनातले स्वास्थ्य? ते कोण पुरवणार? म्हणजे मुले जन्मालाच घालू नयेत असे नाही पण त्यांची योग्य देखभाल करणे हेही आई-वडिलांचे कर्तव्य आहे ना! आज परिस्थिती बदलते आहे. योग्यायोग्यतेचा सारासार विचार करूनच मुलांना जन्म देण्याचे दिवस आले आहेत. नाहीतर ओघानेच म्हणावे लागेल, ‘‘काजल्याला फळे आणि दुबळय़ाला बाळे’’ हेच खरे.
*🖊माधवी वैद्य* madhavivaidya@ymail.com
==============
*संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव*
*दिनांक- ९ फेब्रु. २०२२*
No comments:
Post a Comment