बदली

Thursday, 3 March 2022

(१) विशेषणांचा क्रम (२) ‘ऊन’ प्रत्ययाचा भ्रम..

 *भाषासूत्र, दै.लोकसत्ता*


🎯 *(१) विशेषणांचा क्रम (२) ‘ऊन’ प्रत्ययाचा भ्रम..*


(१) शब्दक्रम : हे वाक्य वाचा- ‘आमच्या पन्नासाव्या लग्नाच्या वाढदिवसाला तुम्ही सर्वानी यायचं, बरं का!’ या वाक्यात ‘पन्नासाव्या’ हे विशेषण ‘लग्नाच्या’ या शब्दाआधी आल्यामुळे या वाक्याचा अर्थ असा होईल- ‘आमची पन्नास लग्नं झाली आहेत, या पन्नासाव्या लग्नाचा आज वाढदिवस आहे, त्या समारंभाला तुम्ही सर्वानी यायचं.’ हा अर्थ म्हणजे अनर्थच होय! केवळ विशेषण चुकीच्या ठिकाणी योजल्यामुळे विपरित अर्थ झाला आहे. अशीच एक वाक्यरचना पाहा- ‘आमचे प्राध्यापक उत्तम कविता शिकवतात.’ याचा अर्थ कविता उत्तम आहेत, त्या प्राध्यापक शिकवतात. कविता उत्तम की निकृष्ट हे सांगायचे नाही, तर प्राध्यापक कविता उत्तम शिकवतात, त्यांचे कविता शिकवणे उत्तम आहे. ही दोन्ही वाक्ये अशा योग्य शब्दक्रमात अशी आहेत- ‘आमच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला तुम्ही सर्वानी यायचं बरं का!’ आणि दुसरे वाक्य, ‘आमचे प्राध्यापक कविता उत्तम शिकवतात’.


वाक्यांत ज्या नामाचे (म्हणजे विशेष्याचे) विशेषण असेल, ते त्या नामाआधी योजणे आवश्यक असते. बोलताना जरी शब्दक्रमात गडबड झाली तरी लेखनात मात्र योग्य शब्दक्रम योजणे आवश्यक आहे.


(२) मराठीतील एकाक्षरी धातूंना ऊन प्रत्यय लागल्यास त्याची रूपे अनेकदा चुकीची बोलली आणि लिहिलीही जातात.


एकाक्षरी धातू- खा(खाणे), गा, जा, भी, पी, घे, दे, ने, ये, धू इत्यादी.


या धातूंना ‘ऊन’ प्रत्यय लागल्यास अशी योग्य रूपे होतील- खाऊन, गाऊन, जाऊन, भिऊन, पिऊन, घेऊन, देऊन, नेऊन, येऊन, धुऊन. मात्र याऐवजी- खावून, गावून, जावून इ. अशी रूपे बोलण्यात- लिहिण्यात आढळतात. ही रूपे चुकीची आहेत. याउलट जेव(णे), पाव, धाव इत्यादींना ‘ऊन’ प्रत्यय लागल्यास जेवून, पावून, धावून अशी रूपे होतील. जेऊन, पाऊन, धाऊन अशी होणार नाहीत.


*🖊 यास्मिन शेख*

==============

*संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव*

 *दिनांक- ८ फेब्रु. २०२२*

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...