*भाषासूत्र, दै.लोकसत्ता*
🎯 *आयता मुठा, जावई बुवा उठा !*
एका गावात एक बाई होती. तिला एकुलती एक लेक होती. लेक खूप लाडकी आणि जावई दीड लाडका! सुरुवातीला त्या जावयाचे खूप लाड करावेसे वाटायचे तिला. खाण्याचे म्हणू नका, आगत स्वागताचे म्हणू नका, खूप लाड ! जावईही सुखावला होता. त्याला काय आयतेच सर्व मिळत होते. त्याने साहजिकच हातपाय पसरायला सुरुवात केली. जावयाची आजे सासू चाणाक्ष होती. तिच्या ध्यानी सर्व गोष्ट यायला वेळ लागला नाही.
एकदा जावई बापू बसले होते नाश्त्याला. सासूबाई करत होत्या नाश्त्यासाठी आंबोळय़ा !
आंबोळय़ा म्हणजे जावई बापूंच्या भलताच आवडीचा प्रकार ! त्यांनी आंबोळय़ांवर मस्तच ताव मारण्यास सुरुवात केली. हे आजेसासूबाईंच्या लक्षात आल्यावर त्यांनी आंबोळय़ा करायचा ताबा स्वत:कडे घेतला. आंबोळय़ा करता करता आंबोळय़ांचं पीठ संपायला आले, जावईबापूही खरे तर तृप्तीची ढेकर देत होते. पण आंबोळय़ा इतक्या चविष्ट झाल्या होत्या की आंबोळय़ांची त्यांची मागणी काही थांबत नव्हती. शेवटी आजेसासूबाई चातुर्याने म्हणाल्या, ‘‘ जावई बापू ! करू चुर्र ? का पाणी पिऊन बघताय ?’’ जावई बापूंच्याही झाली गोष्ट लक्षात आली आणि ते म्हणाले. ‘‘धन्यवाद ! आजेसासूबाई! थांबतो आता. नाही तर तुम्ही नक्की म्हणाल, आयता मुठा, जावई बुवा उठा!’’ जावयाने वेळीच स्वत:ला सावरले. ‘आयता मुठा’ म्हणजे आयतीच मिळालेली कोणतीही मूठभर गोष्ट उपभोगणारा ‘आयतोबा’! उपभोगाचाही अतिरेक झाला की तोच जावई दोडका होतो. कुणी पाहुणचार करत गेले तरी त्याचा फायदा आपण किती घ्यायचा याचे तारतम्य हवे आणि करणाऱ्यानेही कुणाचे अगत्य, लाड किती करावे यालाही मर्यादा घालायला हवी. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच! नाहीतर जावई बापू उठा आणि आता घर आपले गाठा! म्हणण्याची वेळ येणारच. माणसाला शहाणपण शिकवणारी ही म्हण ..‘आयता मुठा, जावई बुवा उठा !’
*🖊डॉ. माधवी वैद्य* madhavivaidya@ymail.com
==============
*संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव*
*दिनांक- ११ जाने २०२२*
No comments:
Post a Comment