*भाषासूत्र, दै.लोकसत्ता*
🎯 *आहार आणि वाक्प्रचार*
वाक्प्रचारांना कोणताही विषय वर्ज्य दिसत नाही .रोजचा आहार हा तर दैनंदिन जगण्याशी संबंधित विषय! तो त्यात येणारच!
१. ताकापुरती आजी :
ताक हा रोजच्या जेवणातला पदार्थ! मात्र तोही दुसऱ्याकडून मागायची वेळ काही वेळा येऊ शकते! अशा वेळी एखाद्या बाईकडून ताक मागायचं असेल, तर त्याआधी तिच्याशी गोड बोलायला पाहिजे! ती वृद्ध असेल तर तिच्यासाठी ‘आजी’ असे घरगुती प्रेमाचे, आदराचे संबोधन वापरले पाहिजे, म्हणजे ती खूश होणार! त्यामागची खरी भावना केवळ व्यावहारिक लाभ साधण्याची असते! त्यामुळे ‘ताकापुरती आजी’, म्हणजे गोड बोलून काम साधणे. या वाक्प्रचारात जीवनव्यवहाराचा मंत्रच जणू सांगितला आहे! केवळ दोन शब्दांतून त्यात रोकडा नीतिबोध ठसवला आहे. एक जुने गाणे होते : ‘‘कामापुरता मामा, ताकापुरती आजी, जोवरी पुरवी हट्ट तोवरी, पत्नी असते राजी!’’
यातला ‘कामापुरता मामा’ हा वाक्प्रचारही याच अर्थाचा आहे . लघुरूप हे वाक्प्रचाराचे एक वैशिष्टय़च असते . सूक्ष्म निरीक्षणातून आलेला हा वाक्प्रचार आपल्याला नक्कीच सावध करतो !
२. दही खाऊ की मही खाऊ :
या वाक्प्रचाराचा वाच्यार्थ आहे, दही खाऊ की ताक ( किंवा लोणी ) खाऊ ? मही म्हणजे मंथन करून आलेले! याचा सुचवलेला अर्थ आहे, हे करू की ते करू?- अशी दोलायमान मन:स्थिती होणे! कवयित्री शांता शेळके यांनी मला एकदा सहज गप्पा मारताना सांगितलं होतं की आपण शहरी भागात ‘तळय़ात मळय़ात’ म्हणतो, त्याऐवजी ग्रामीण भागात ‘दही खाऊ की मही खाऊ’ असं म्हणतात ! शांताबाईंचे बालपण खेड – मंचर अशा तेव्हाच्या खेडय़ांमध्ये गेले होते. त्यांची भाषेविषयीची जिज्ञासा तल्लख होती! खरंच! तळे आणि मळे, या अनुप्रासाने जोडलेल्या शब्दांमधून दोन भिन्न पर्याय सूचित होतात. अशा वेळी कोणता पर्याय निवडावा, असा पेच आपल्याला काही प्रसंगांत पडतो! हीच संभ्रमावस्था याही वाक्प्रचारातून व्यक्त होते. यातही दही आणि मही यामध्ये अनुप्रास वापरला आहे. त्यामुळे साधलेली लय अनुभवताना मनाचा झोका नेमकेपणाने सूचित झाला आहे
*🖊डॉ. नीलिमा गुंडी* nmgundi@gmail.com
==============
*संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव*
*दिनांक- १२ जाने २०२२*
No comments:
Post a Comment