बदली

Thursday, 3 March 2022

काय म्हणता अप्पा?

 *भाषासूत्र, दै.लोकसत्ता*


🎯 *काय म्हणता अप्पा?*


‘किती सुरेख आहे गं दर्शनचित्र! निळा वेश अगदी खुलून दिसतोय तुला.’


छान वाटलं ना मंडळी हे वाचल्यावर.‘काय म्हणताय? बरेच दिवसांत संदेश नाही तुमचा.’


अशी विचारणा केल्यावर बरं वाटलं ना?

एकमेकांची चौकशी, गप्पा आणि एकूणच संदेशवहनासाठी व्हॉट्सअप आणि इतर अनेक समाजमाध्यमं आपण सतत वापरतो. व्हॉट्सअपला ‘काय अप्पा’ असं मजेशीर पण सार्थ नाव कुणीतरी सुचवलं आहेच. छानच आहे ते. पण समजा, ‘व्हॉट्सअप’ हे विशेषनाम आहे, म्हणून त्याचं नाव बदललं नाही तरी त्या संदर्भातल्या इतर शब्दांना अनेक मराठी प्रतिशब्द नक्कीच सुचवता येतील. सुरुवातीला आल्याप्रमाणे डिस्प्ले पिक्चर म्हणजेच डीपीसाठी ‘दर्शनचित्र’, मेसेजसाठी ‘संदेश’, व्हिडीओकॉलसाठी ‘दर्शभाष’, फोटोसाठी ‘प्रतिमा’, ‘छायाचित्र’, ‘प्रकाशचित्र’, ‘प्रचित्र’ असे सुंदर अर्थवाही शब्द आहेतच. संदेश फॉरवर्ड म्हणजेच पुढे पाठवायला ‘अग्रेषित’, डिलिटसाठी ‘पुसणे’, ‘खोडणे’, ‘काढून टाकणे’, डिलिट फॉर ऑलसाठी ‘सर्वाकडून पुसा’ किंवा ‘सर्वाकडून काढून टाका’ असं म्हणता येईल. सेव्ह करणे यासाठी ‘जतन करणे’, शेअर करणे यासाठी ‘पाठवणे’,‘सामायिक करणे’ हे शब्द कसे वाटतात? स्क्रीनला ‘पडदा’ किंवा ‘पट’, स्क्रीन शॉटसाठी ‘पट प्रतिमा’ चपखल वाटतोय ना? व्हॉट्सअप आल्यावर एक शब्द वारंवार वापरावा लागला तो म्हणजे चॅट. इंग्रजीत चॅट म्हणजे गप्पागोष्टी. मग या संदर्भात त्याला ‘गप्पा’ किंवा ‘संदेशलेखन’ असं म्हणू शकतो का? नोटिफिकेशन हा एक असाच शब्द. त्याला फक्त सूचना म्हणावं तरी काहीतरी अपुरं असल्यासारखं वाटतं. मग ‘सूचना संदेश’ म्हटलं तर? कॉमेंटला ‘टिप्पणी’, ‘नोंद’ असे संदर्भानुसार वापरता येईल. ग्रुपसाठी ‘गट’ किंवा ‘समूह’, अ‍ॅडमिनसाठी ‘प्रशासक’ हे शब्द आता बऱ्यापैकी रुळले आहेत. तंत्रज्ञान किंवा माध्यमांशी संबंधित अनेक शब्द या क्षेत्रातल्या क्रांतीसारखेच वेगाने आपल्यावर आदळले. त्यामुळे याला मराठीत काय म्हणायचं, असा विचार करण्यापूर्वीच आले तसे इंग्रजी शब्द रूढ होत गेले. पण अजूनही सर्वानी जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर आपण या क्षेत्रातही मराठी शब्द रुजवू शकतो, अशी मला आशा आहे.


तुम्हालाही आहे ना?   


*🖊वैशाली पेंडसे-कार्लेकर*

vaishali.karlekar1@gmail.com

==============

*संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव*

 *दिनांक- ३ फेब्रु. २०२२*

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...