बदली

Thursday, 3 March 2022

कासवीचे तूप, संसाराचे रूप..

 *भाषासूत्र, दै.लोकसत्ता*


🎯 *कासवीचे तूप, संसाराचे रूप..*


एका गावात एका आचार्याचा मठ होता. त्या आचार्याचे नाव आनंदाचार्य. आपल्या आयुष्यात निरपेक्ष वृत्तीने काम करत राहणे, ही शिकवण ते गावकऱ्यांना देत असत. ते संसाराचे सार इतके सुंदर उलगडून सांगत असत की त्यांचे विचार आणि बोलणे ऐकतच राहावे असे वाटत असे. म्हणूनच की काय त्यांच्या व्याख्यानांना गर्दी होत असे. लोक भक्तिभावाने त्यांचे विचार ऐकत असत.


एकदा असेच प्रवचन चालू असताना आचार्य म्हणाले, ‘‘स्वार्थ नको, परमार्थ साधना करा. संसाराची आसक्ती धरू नका. संसार नश्वर आहे. तो शाश्वत नाही. ती माया आहे. त्या संसारात गुरफटून जाऊन त्याच्या तात्कालिक सुखात गुंतून पडू नका. म्हणतात ना.. ‘कासवीचे तूप, संसाराचे रूप’..’’ हे वाक्य ऐकल्यावर श्रोत्यांच्या चेहऱ्यावर मोठे प्रश्नचिन्ह उमटले. ते आचार्याना स्पष्टपणे दिसले. आचार्य म्हणाले, ‘‘नाही कळला ना याचा अर्थ ? ठीक आहे, मी फोड करून सांगतो. अरे! अर्थ सोपा आहे. असं बघा, कासवी कधी दूध देते का ? नाही ना ? मग ती जर दूधच देत नाही तर त्या दुधाचे दही, ताक, लोणी कसे होणार ? आणि लोणीच नाही तर तूप मिळणे लांबच! म्हणूनच हे जसे शक्य नाही तसेच संसाराचे बाह्य, मोहमयी रूप कितीही मंथून काढलेत तरी त्यापासून मुक्तीचे नवनीत निघणे अशक्य आणि म्हणूनच मग प्राप्तीही दूरच राहणार! संसार असार आहे. या दृष्टीने पाहायला हवा. ‘कासवीचे तूप, संसाराचे रूप’ या म्हणीप्रमाणे परमार्थ वृत्ती आचरत आचारत अनासक्त वृत्तीने जो संसारात जगतो, त्यालाच मुक्ती प्राप्त होते. हे सदैव लक्षात ठेवा.’’


या म्हणीत खरोखर जीवनाचे सार सामावलेले आहे. जे ‘नाहीच आहे’ ते ‘आहे’ असे समजून त्याच्या मागे धावणे म्हणजे मृगजळाच्या मागे धावण्यासारखे आहे. लहानशीच म्हण, पण जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवून  जाणारी आहे.


 नाही का?


*🖊डॉ. माधवी वैद्य*

==============

*संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव*

 *दिनांक- १ फेब्रु. २०२२*

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...