महाराष्ट्र टाईम्स
समस्येतून उपक्रम निर्मिती..
@प्रज्ञा कदम
चांगला शिक्षक हा समस्येला संधी मानून त्यातून उपक्रमांची निर्मिती करतो .जिल्हा परिषदेची अस्नोली ची शाळा असो किंवा अंबरनाथ मधील शिळ ची शाळा असो शाळेतील विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी संजय गरबड मराठे सातत्याने प्रयोग करत आहेत आणि त्याला उत्तम यशही लाभत आहे. ग्रामीण भागातील मजुरी किंवा शेती करणाऱ्या पालकांची मुले शाळेत येताना खाऊसाठी पैसे घेऊन येतात .काही मुलांचे पैसे पडतात तर काही जण पैशासाठी भांडणे करतात तेव्हा गुरुजींनी दररोज प्रत्येक विद्यार्थ्यांचे खाऊचे पैसे गोळा केले. वर्षभर ते साठवले त्यातून विद्यार्थी बँकेची निर्मिती झाली. या रकमेतून मुलांना वही पेन पुस्तक इत्यादी शैक्षणिक साहित्य त्यांनी वर्षभर पुरवले त्यामुळे पालकांना देखील शाळेबद्दल विश्वास निर्माण झाला विद्यार्थ्यांच्या मध्ये शैक्षणिक साक्षर ते बरोबर आर्थिक साक्षरता ही निर्माण झाली मुलांना बचतीचे महत्त्व समजले.
गणपती उत्सवामध्ये गावात पालक मोठ्या प्रमाणावर पत्ते खेळत. मुलेही पालकांचे अनुकरण करत पत्ते खेळू लागली. पालकांनी सरांकडे त्याबाबत तक्रार केली त्यावेळी सरांनी स्वतः पत्त्यांचा कॅट मागवून घेतला. राजा राणी जोकर हे पत्ते बाजूला काढले. गुलाम ला शून्य अंक दिला आणि पत्यातून गणित अध्यापनाचा नवा उपक्रम सुरू केला. प्रत्येक विद्यार्थ्याला तीन पत्ते देऊन संख्यांचा चढता उतरता क्रम लावणे, तीन अंकी मोठी संख्या बनवणे ,लहान संख्या बनवणे, बेरीज करणे, वजाबाकी करणे या क्रिया शिकवल्या .अशाप्रकारे खेळातून विद्यार्थ्यांचा गणितासारखा विषय पक्का केला.
पहिली ते चौथीच्या मुलांना बऱ्याच वेळा शैक्षणिक संबोध समजून घेणे अवघड जाते .त्यावर उपाय म्हणून गुरुजींनी शासनाने पुरवलेल्या भाषा, गणित ,विज्ञान या विषयाच्या पाठ्यपुस्तकांचे स्क्रीन शॉर्ट काढून व्हिडिओ बनवले. त्याला विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा आवाज दिला त्यामुळे मुलांचे आकलन सुलभ झाले. विद्यार्थ्यांच्या वयानुसार, इयत्तेनुसार शैक्षणिक व्हिडिओ तयार केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनात गोडी निर्माण झाली. तसेच गाव पातळीवरचे पाणी समस्ये सारखे प्रश्न सोडवण्यासाठी 'सांग सांग भोलानाथ 'सारखी शॉर्ट फिल्म ही सहकार्यांच्या मदतीने बनवली. यात स्थानिक विद्यार्थ्यांना अभिनयाची संधी दिली .'धडा ','समीर', यासारख्या शैक्षणिक शॉर्टफिल्म मध्येही मुले चमकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला आणि जनजागृतीही झाली.
मुले स्वतःचे मत मांडायला किंवा बोलायलाही घाबरत असत. या समस्येवर मात करण्यासाठी सरांनी पाच प्रकारची वृत्तपत्रे शाळेत आणायला सुरुवात केली. त्यातील बोधकथा, प्राणी-पक्षी, चालू घडामोडी, अग्रलेख यांच्या कात्रण वह्या मुलांकडून करून घेतल्या. त्यामुळे मुले त्या त्या विषयाचे वाचन करू लागली. एकमेकांना त्या विषयांची कात्रणे देण्यास मदत करू लागले त्यांच्यातील सहकार्य वाढले ती अभिव्यक्त होऊ लागली त्यामुळे विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील घडामोडींचा अंदाज येऊ लागला.
पहिली ते चौथीच्या मुलांना विज्ञान शिकवताना केवळ नावे सांगून पदार्थ किंवा वनस्पती लक्षात येत नाही .यावर उपाय म्हणून वर्गाच्या एका कोपऱ्यात प्लास्टिकच्या छोट्या छोट्या डब्यांमध्ये जायफळ ,मायफळ, दालचिनी सारखे मसाल्याचे पदार्थ, कडधान्य ,औषधी वनस्पती विविध चवीचे पदार्थ, पारदर्शक अपारदर्शक पदार्थ प्रत्यक्ष ठेवले मुले त्या वस्तू पाहतात. त्याचा रंग, आकार यामुळे त्या त्या पदार्थांचे आकलन मुलांना उत्तम होते. हा विज्ञान कोपरा विद्यार्थ्यांमधील कल्पकतेला वाव देतो. त्यांच्या संकल्पना दृढ करतो.
मुलांचा शब्दसंग्रह वाढवण्यासाठी 'शब्द जत्रा 'सारखा उपक्रम राबवला जातो .यात विद्यार्थ्यांना एक शब्द देऊन त्या शब्दाला अनुसरून शब्दांची जत्रा भरवली जाते .उदाहरणार्थ पावसामध्ये मिळणाऱ्या वस्तूंची नावे सांगा -ढग, विजा, चिखल इत्यादी किंवा बाजारात पाहिलेल्या वस्तूंची नावे सांगा यामुळे मुलांची शब्दसंपत्ती वाढते व कधीकधी ग्रामीण भागातील शब्द शिक्षकांनाही मुलांकडून नव्याने समजतात व शिक्षक विद्यार्थ्यांकडून शिकतात.
मुलांना आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करण्यास प्रवृत्त करून त्यातील उपयोगी वस्तूंचा आणि सुंदर सुबक वस्तूंचा संग्रह करण्यास शिकवले जाते. शंख-शिंपले ,रंगीत खडे, विविध झाडांच्या काड्या ते जमवतात .याला जोडून स्थानिक बांबूकाम, मातीकाम, कापड काम करणाऱ्या कारागिरांना किंवा व्यवसायिकांना शाळेत त्यांच्या वेळेनुसार बोलावले जाते. मुले प्रत्यक्ष एक तास त्यांच्याकडून बांबू पासून बनणाऱ्या वस्तू, माती पासून बनणाऱ्या वस्तू ,कापडा पासून बनणाऱ्या वस्तू यांची माहिती घेतात व प्रत्यक्ष कृती देखील करतात .यामुळे मुलांचा कौशल्य विकास होतो .संदीप पाटील सारखे पालक देखील पारंपारिक गाणी ,गोष्टी ,चालीरीती यांचे कृती युक्त ज्ञान मुलांना देतात. त्यामुळे शाळा ,पालक आणि गाव जोडली जातात व त्यांच्यामध्ये सामाजिक अभिसरण निर्माण होते.
चांगला शिक्षक हा फक्त शाळेचा नसतो तर तो त्या गावाच्या परिवर्तनाचा केंद्रबिंदू असतो म्हणूनच गावातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी अनेक कार्यक्रम आखले जातात. त्यातून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या ,सामाजिक स्थान याविषयी लोकांमध्ये जागृती केली जाते .गावातील सर्व किशोरवयीन मुलींसाठी पराग फाउंडेशन यांच्याकडून त्यांनी सॅनिटरी पॅडचे दरमहा वाटप केले जाते .तसेच विविध सामाजिक संस्थांकडून कॉम्प्युटर ,टीव्ही ,कपडे ,दप्तर छत्री ,रेनकोट, दिवाळी फराळ ,धान्य इत्यादी गोष्टींचे वाटप केले जाते .या सर्व उपक्रमांमुळे मुलांचा मानसिक, भावनिक ,सामाजिक, नैतिक विकास होत आहे. शिक्षणाबरोबर चारित्र्यसंपन्न पिढी घडवण्याचे काम याद्वारे होत आहे .त्यासाठी केवळ दहा ते पाच या वेळेत व्यतिरिक्त सर शाळेत थांबतात .2009 -10 रोजी संजय मराठे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला .जागतिक बँकेने शाळेचा व विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा पाहून 2008 मध्ये इंडोनेशिया देशाचे स्मृती चिन्ह असलेली ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव केला.
लॉक डाऊन च्या काळात मुलांकडे मोबाइल नव्हते .काही ठिकाणी नेटवर्क नव्हते. अशा वेळी प्रत्यक्ष वस्तीवर जाऊन मुलांना एकत्र करून त्यांच्याकडून कृतीपत्रिका सोडवून घेतल्या. त्यांच्यामध्ये शासन व लोक काय करतात यापेक्षा विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकाचे मन काय म्हणते हे जास्त महत्त्वाचे आहे. विद्यार्थी आपल्यापर्यंत पोहोचले नाही तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे असे त्यांचे मत आहे .असे तळमळीचे शिक्षक नवा समाज घडवू शकतात.

No comments:
Post a Comment