🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬
🤔 कुतूहल 🤔
🎯 नामशेष होण्याच्या मार्गावरील समुद्रघोडा
समुद्रघोडा हा एक प्रकारचा अस्थिमत्स्य असून त्यात विविध वैशिष्टय़े आढळतात. हा सिन्ग्नाथीफॉरमिस गणातील हिप्पोकॅमपिडी या कुळातील असून त्याच्या ५६ प्रजाती उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण समुद्रात आढळतात. उथळ खाडीक्षेत्रापासून ते साधारण १५० मीटर खोलीपर्यंत समुद्रघोडे आढळतात. यांचा सर्वात जास्त प्रमाणात वावर इंडो-पॅसिफिक प्रदेशात सुमारे ४५ अक्षांश उत्तर ते ४५ अक्षांश दक्षिण या क्षेत्रामध्ये दिसून येतो. आयुष्यमान सुमारे तीन ते चार वर्षे असणाऱ्या समुद्रघोडय़ांच्या १० प्रजाती भारतीय सागरी क्षेत्रात आहेत. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर यापैकी फक्त पिवळे ठिपके असलेली, हिप्पोकॅम्पस कुडा ही प्रजाती आढळते.
समुद्रघोडय़ाच्या अंगावर खवल्यांऐवजी चिवट कातडीचे आवरण असते. त्यांच्या शरीरात खूप कमी मांस असून ते मुख्यत्वे हाडांच्या बांधणीने तयार झालेले असते. याच्या डोक्याचा आकार घोडय़ाप्रमाणे असतो आणि नळीप्रमाणे लांब तोंड असते. कॅमेलियन या सरडा-सदृश प्राण्याप्रमाणे समुद्रघोडय़ाचे डोळे स्वतंत्रपणे ३६० अक्षांशमध्ये फिरू शकल्याने त्यांना एकाच वेळी पुढे मागे पाहता येते. समुद्रघोडा आपल्या शेपटीचा वापर आधार पकडून ठेवण्यासाठी करतात. पिल्लांना वाढविण्यासाठी नरांमध्ये भ्रूणधानी (‘ब्रूड पाऊच’) असते. प्रजननासाठी नर आणि मादी जोडी करून आयुष्यभर सोबत राहतात. शत्रूंपासून बचाव करण्यासाठी आणि मादीला आकर्षित करण्यासाठी समुद्रघोडे आपला रंग बदलतात.
चीन, हाँगकाँग, व्हिएतनाम यांसारख्या देशांमध्ये व पारंपरिक चिनी औषधांमध्ये समुद्रघोडय़ांचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. नपुंसकता आणि वंध्यत्व, कामोत्तेजक औषधे, दमा, उच्च कोलेस्टेरॉल, गलगंड, मूत्रिपड विकार आणि त्वचाविकार यांसारख्या आजारांच्या उपचारांमध्ये वाळवलेल्या समुद्री घोडय़ांचा वापर केला जातो. दरवर्षी किमान २.५ कोटी समुद्रघोडे (सुमारे २० मेट्रिक टन) पारंपरिक चिनी औषधांसाठी मारले जातात. मत्स्यालयातील शोभिवंत मासे आणि शोभेच्या वस्तू म्हणून यांचा व्यापार होतो. वाढत्या मागणीमुळे आणि अनिर्बंध मासेमारीमुळे समुद्रघोडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. २००१ मध्ये, भारत सरकारने पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या राजपत्र अधिसूचनेद्वारे, समुद्रघोडय़ांच्या सर्व प्रजाती (सर्व सिन्ग्नाथीडी मासे), वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या शेडय़ूल १ अंतर्गत संरक्षित केल्या आहेत. त्यानुसार समुद्रघोडे जिवंत किंवा वाळलेल्या स्वरूपात विकण्यास व बाळगण्यास पूर्णपणे बंदी आहे.
🖊डॉ. सुशांत सनये
office@mavipamumbai.org
=============
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा ! ! !
📡 जय विज्ञान 🔬
संकलक - नितीन खंडाळे
- चाळीसगाव
दै_लोकसत्ता
दिनांक- ८ मे २०२३
==============
No comments:
Post a Comment