बदली

Friday, 26 May 2023

गोंडवनावर संशोधन करणारी शास्त्रज्ञ

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 गोंडवनावर संशोधन करणारी शास्त्रज्ञ


रचनात्मक भूगर्भ शास्त्रज्ञ (स्ट्रक्चरल जिऑलॉजिस्ट) प्रा. सुदीप्ता सेनगुप्ता यांचे कॅम्ब्रियन खडकांच्या निर्मितीबाबतचे संशोधन प्रसिद्ध आहे. १९८३ सालच्या भारताच्या तिसऱ्या मोहिमेअंतर्गत अंटार्क्टिकावर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञांपैकी त्या एक आहेत. संशोधन कार्याबरोबरच ‘दक्षिण गंगोत्री’ हे अंटार्क्टिकावरील पहिले भारतीय संशोधन केंद्र स्थापन करण्यात त्यांचा सहभाग होता. 


प्रा. सुदीप्ता यांचे मोहिमेतील अंटार्क्टिकावरील शिरमाचर या टेकडीचे भूगर्भशास्त्रीय संशोधन मूलभूत व अतिमहत्त्वाचे होते. त्याचा उपयोग प्राचीन काळातील हवामानाचा अभ्यास करून भविष्यातील हवामानाचे भाकीत करण्यासाठी होतो.


लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवरील भूखंड एकसंध होता. कालांतराने त्याचे तुकडे झाले आणि जगाचा नकाशा बदलत राहिला. या तुकडय़ांपैकी सर्वात मोठय़ा तुकडय़ाचे नाव आहे ‘गोंडवन’. सुमारे १० लाख वर्षांपूर्वी याचेही छोटे तुकडे होऊन अफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका हे भूप्रदेश तयार झाले. भारत व अंटार्क्टिका हे प्राचीन गोंडवनाचा भाग असल्याने पूर्व अंटार्क्टिकावरील खडक व दक्षिण भारतातील खडक यांच्यात साधर्म्य आढळते. प्रा. सुदीप्ता यांचे  अंटार्क्टिकावरील संशोधन हे या विषयातील पुढील संशोधनासाठी मार्गदर्शक ठरले. प्रा. सुदीप्ता यांनी १९८९ साली नवव्या अंटार्क्टिका मोहिमेत भाग घेतला आणि गोंडवनावर संशोधन केले.


प्रा. सुदीप्ता यांनी कोलकाता येथील जादवपूर विद्यापीठातून भूगर्भशास्त्र या विषयात बी.एस्सी. व एम.एस्सी. केले, नंतर रचनात्मक भूगर्भशास्त्र या विषयात १९७२ साली पीएच.डी. केली. १९७३ सालापासून  ब्रिटन सरकारच्या ‘रॉयल कमिशन फॉर जिऑलॉजीच्या शिष्यवृत्ती’अंतर्गत तीन वर्षे लंडनमधील इम्पिरियल कॉलेजमध्ये संशोधन केले. त्यानंतर स्वीडनमधील उप्पसाला विद्यापीठात अध्यापन संशोधन करून १९७९ साली भारतात परत आल्या आणि वरिष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ म्हणून त्या ‘जिऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’मध्ये रुजू झाल्या. १९८२ ते २००६ या  कालावधीत निवृत्तीपर्यंत त्यांनी जादवपूर विद्यापीठात भूगर्भशास्त्राचे अध्यापन केले.


प्रा. सुदीप्ता यांचे अनेक वैज्ञानिक लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध  झाले आहेत. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय ‘शांती स्वरूप भटनागर अवॉर्ड’, ‘फेलो ऑफ इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी’, ‘नॅशनल मिनरल अवॉर्ड’, ‘अंटार्क्टिका अवॉर्ड’ इत्यादींसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांच्या प्रा. सुदीप्ता सेनगुप्ता मानकरी आहेत.


  🖊अनघा शिराळकर

office@mavipamumbai.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- २६ मे २०२३

==============

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...