🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬
🤔कुतूहल 🤔
🎯 समुद्री ड्रॅगन
चिनी लोककथांमधील ड्रॅगन खरोखर अस्तिवात नसले तरी अद्भुत समुद्री दुनियेमध्ये ड्रॅगनप्रमाणे दिसणारे अनोखे मासे आपले वैशिष्टय़ टिकवून आहेत. सिन्ग्नाथिफॉरमिस गणातील समुद्री ड्रॅगनच्या २ कुळांमध्ये एकूण तीन प्रदेशनिष्ठ प्रजाती असून मुख्यकरून त्या ऑस्ट्रेलिया द्विपकल्पाच्या दक्षिण व पश्चिम किनारपट्टीच्या समुद्रामध्ये आढळून येतात. फायकोडुरस कुळामध्ये लिफी समुद्री ड्रॅगनची एक तर फायलोटेरिक्स कुळामध्ये विडी समुद्री ड्रॅगन आणि रुबी समुद्री ड्रॅगन या दोन प्रजातींचा समावेश आहे. समुद्री ड्रॅगनच्या मुख्य अधिवास क्षेत्रामध्ये समुद्री शैवाल आणि वाळू असलेल्या समुद्री गवताच्या कुरणांचा समावेश होतो. बरेचसे समुद्रघोडे आणि नळी मासे उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण समुद्रात आढळतात. या उलट समुद्री ड्रॅगन शीत कटीबंधीय समुद्रामध्ये आढळतात. समुद्राच्या ५० मीटर खोलीपर्यंत समुद्री ड्रॅगन आढळून येतात.
समुद्रघोडय़ांच्या तुलनेत समुद्री ड्रॅगनचे नळीसारखे तोंड खूपच लांब असते. दात नसलेल्या नळीसारख्या तोंडाने ते लहान समुद्री जीवांना गिळतात. लिफी समुद्री ड्रॅगनच्या शरीरावर पानांप्रमाणे दिसणाऱ्या अवयवांची बाह्यवाढ झालेली असते आणि त्याचा उपयोग छद्मवेषासाठी होतो. लिफी समुद्री ड्रॅगनची लांबी साधारणपणे २० सेंमीपर्यंत असते तर विडी समुद्री ड्रॅगन तुलनेने दुप्पट लांबीचे म्हणजेच ४०-४५ सेंमी आकाराचे असतात. लिफी समुद्री ड्रॅगन पिवळसर ते तपकिरी रंगाचे असतात तर विडी समुद्री ड्रॅगन पिवळसर, शेवाळी आणि निळय़ा तसेच चमकणाऱ्या रंगछटेचे असतात. रुबी समुद्री ड्रॅगन नावाप्रमाणे गडद लाल रंगाचा असतो. साधारण २ वर्षांनंतर समुद्री ड्रॅगन प्रजनन करण्यायोग्य होतात. मादी समुद्री ड्रॅगन १२०-२५० पर्यंत अंडी देते. ती अंडी नर समुद्री ड्रॅगन आपल्या शेपटीखालील कप्प्यामध्ये वाढवतात. ८-९ आठवडय़ानंतर त्यामधून पिल्ले बाहेर येतात. समुद्री ड्रॅगनचे आयुष्य ५-६ वर्षे असते.
समुद्रघोडे आणि नळी माशांप्रमाणे यांचा वापर चिनी पारंपरिक औषधांमध्ये जास्त प्रमाणावर होत नाही. परंतु खाऱ्या पाण्यातील शोभिवंत माशांच्या मत्स्यालयामध्ये याचा वापर काही देशांमध्ये केला जातो. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’च्या धोक्यात आलेल्या प्राण्यांच्या ‘रेड लिस्ट’ मध्ये समुद्री ड्रॅगनच्या प्रजातींचा समावेश कमी धोका असलेल्या प्रजाती म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये या प्रजातींना स्थानिक धोक्यांमुळे संरक्षित करण्यात आलेले आहे.
🖊डॉ सुशांत सनये
office@mavipamumbai.org
=============
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा ! ! !
📡 जय विज्ञान 🔬
संकलक - नितीन खंडाळे
- चाळीसगाव
दै_लोकसत्ता
दिनांक- १० मे २०२३
==============
No comments:
Post a Comment