🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬
🤔 कुतूहल 🤔
🎯 सागरी विषाणू
सागरी विषाणू महासागर, समुद्र, खाडय़ांतील जीवांत म्हणजेच अप्रत्यक्षपणे खाऱ्या पाण्यात राहतात. आपल्याला ज्ञात सर्व विषाणूप्रकार सजीवांच्या पेशींत शिरल्यावरच जिवंतपणा दाखवतात. त्यांचे जिवंतपणाचे एकमेव लक्षण म्हणजे स्वत:च्या प्रती निर्माण करणे.विषाणू सजीवाच्या पेशींत शिरले की त्या जीवपेशींनाच विषाणूंच्या प्रती निर्माण करण्यास भाग पाडतात. जिवंत पेशींबाहेरचे विषाणू निर्जीव, निश्चल राहतात. मग ते वातावरणात असोत की प्राणीपेशींबाहेर वा प्राणीशरीरात असोत. शरीर पेशीमय असेल त्यांनाच आपण सजीव मानतो. या अटीनुसार विषाणू सजीव नाहीत. पण विषाणूंबद्दल हळूहळू एवढय़ा नवनव्या गोष्टी कळत आहेत की सजीवाची व्याख्या जास्त समावेशक करून विषाणूंना पेशीनिम्नस्तरावरील सजीवसम (सबसेल्युलर लाइफ) मानावे असा विचार बळावत आहे.
जगात सर्वाधिक संख्येने असलेले जीव म्हणजे जिवाणू. बॅक्टेरियांच्या आत राहणारे ‘बॅक्टेरियोफेजेस’ हे विषाणू त्या जिवाणूंपेक्षा अंदाजे शंभर पटींनी जास्त असतात. समुद्राच्या पाण्याचे वेगवेगळय़ा ठिकाणचे आणि खोलीवरचे नमुने तपासून शास्त्रज्ञांनी सागरात १०२८ जिवाणू (एकावर अठ्ठावीस शून्य) एवढे जिवाणू असावेत, असा अंदाज केला आहे. जिवाणूसंख्या १०२८ असेल आणि एका जिवाणूत शंभर बॅक्टेरियोफेजेस विषाणू असतील असे गृहीत धरले तर सागरातील बॅक्टेरियोफेजेसची संख्या खूपच प्रचंड भरेल. परंतु हे अद्भुत एवढय़ावर थांबत नाही, कारण बॅक्टेरियोफेजेस हा विषाणूंचा फक्त एक प्रकार आहे. एका सर्वेक्षणानुसार आतापर्यंत आपल्याला दोन लाख जातींचे सागरी विषाणू माहीत झाले आहेत. शिवाय इतर शेकडो प्रकारचे सजीव आहेत. केवळ सागरी माशांच्याच २०,००० जाती आहेत. एकेका प्रजातीचे सजीव आणि त्यातील विषाणू प्रकारांची संख्या डोके चक्रावेल एवढी मोठी आहे.
आपण जमिनीवर राहतो. सागरी विषाणूंशी आपला संबंध काय असे काहींना वाटेल. आपल्याला ऑक्सिजन लागतो. हिरव्या झाडांपेक्षा खूप जास्त ऑक्सिजन सागरी जिवाणू बाहेर टाकतात. सागरी विषाणू सागरी जिवाणूंना मारतात. त्यामुळे जिवाणू तसेच शेवाळे, प्लवके (पाण्यावर पोहणारे, तरंगणारे छोटे जीव) यांचीही संख्या नियंत्रित करतात. या संहारातून मोकळी झालेली कार्बन, नायट्रोजन यांसारखी मूलद्रव्ये आणि त्यांची भू-रासायनिक चक्रे एका परीने अतिसूक्ष्म असे सागरी विषाणूच चालवतात. मात्र सागरी प्राण्यांना अनेक प्रकारच्या विषाणूंमुळे होणारे रोग होत असतात. विषाणू संक्रमणामुळे मत्स्यशेतीचे देखील मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे विषाणूंना सागरी अभ्यासक गांभीर्याने घेतात.
🖊नारायण वाडदेकर
office@mavipamumbai.org
=============
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा ! ! !
📡 जय विज्ञान 🔬
संकलक - नितीन खंडाळे
- चाळीसगाव
दै_लोकसत्ता
दिनांक- ६ एप्रिल २०२३
==============
No comments:
Post a Comment