बदली

Thursday, 27 April 2023

महाकाय शुभ्र शार्क (द ग्रेट व्हाइट शार्क)

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 महाकाय शुभ्र शार्क (द ग्रेट व्हाइट शार्क)


स्टीव्हन स्पीलबर्गच्या ‘जॉज’ सिनेमामुळे द ग्रेट व्हाइट शार्क खलनायक ठरले. खुनशी ‘ग्रेट व्हाइट’ माणसांवर घातक जीवघेणे हल्ले करतो असे त्या चित्रपटकथेत होते. ज्या पुस्तकावर चित्रपट आधारलेला होता त्याच्या लेखकाने पुढे आपल्यामुळे ग्रेट व्हाइट शार्क बदनाम झाल्याबद्दल माफी मागितली. उरलेले आयुष्य शार्कसंवर्धनासाठी वेचले. पण ग्रेट व्हाइटची माथेफिरू हल्लेखोर प्रतिमा ठसलीच.


जगभर ‘ग्रेट व्हाइट’ माध्यमांचा लाडका म्हणून लोकप्रिय होता. घरात सुरक्षित बसून त्याच्याबद्दल वाचायला लोक उत्सुक असायचे. आजही असतात. पांढऱ्या शुभ्र पोटावरून, अतिभव्य आकारावरून त्याना ‘ग्रेट व्हाइट’ नाव पडले. त्यांच्या ‘कारकॅरोडॉन कॅरकॅरिअस’ शास्त्रीय नावाचा ग्रीकमध्ये अर्थ आहे – ‘धारदार दात’. ‘ग्रेट व्हाइट’ हे प्रशांत, अॅटलांटिक, हिंदी, अंटाक्र्टिक अशा सर्व महासागरांत कमीअधिक प्रमाणात वावरतात. ‘ग्रेट व्हाइट’चे कमाल वजन २,२०० किलोपर्यंत, लांबी वीस फुटांपर्यंत असते. शीतरक्ती असूनही ते स्नायूंनी निर्मिलेल्या उष्णतेने शरीर उबदार ठेवतात. त्यामुळे अन्य मासे जात नाहीत अशा थंड पाण्यातही ते जातात.


चित्रपटातल्या त्यांच्या हिंस्र प्रतिमेच्या ते उलट असतात. महाकाय शुभ्र शार्क शांत, थोडे आळसटच असतात. माणसांवर विनाकारण हल्ले करण्यात ग्रेट व्हाइटपेक्षा टायगर शार्क, बुल शार्क आघाडीवर असतात. कोणत्या जातीच्या शार्कने हल्ला केला हे जखमी माणसातल्या एखाद-दुसऱ्या दातावरून, दातठशांवरून शार्कतज्ज्ञ शोधतात. शार्कतज्ज्ञांना हल्लेखोराची ओळख पटण्याआधीच सामान्यजन सगळे हल्ले महाकाय शुभ्र शार्कनी केल्याचा निष्कर्ष काढतात.

महाकाय शुभ्र शार्क क्वचितच माणसांवर हल्ले करतात. त्यांना माणूस, अन्न म्हणून आवडत नाही. माणसात स्नायू जास्त, चरबी कमी असते. सील, डॉल्फिनमध्ये ‘ब्लबर’ म्हणजे कातडीखाली भरपूर जाड चरबी असते. त्यामुळे त्यांना माणसापेक्षा सील, डॉल्फिन, पाणमांजरे खायला आवडतात. खरे तर महाकाय शुभ्र शार्कपासून माणसांना असणाऱ्या धोक्यापेक्षा माणसांपासून त्या शार्कना जास्त धोका असतो. माणसे शार्कना त्यांचे पर, कातडी, यकृततेल, मांसासाठी मारतातच, शिवाय निव्वळ शिकारीच्या थरारासाठीही मारतात.


२००३ मध्ये तीस महाकाय शुभ्र शार्कना शास्त्रज्ञांनी उपग्रहांतून मागोवा घेण्याजोग्या खूणचिठ्ठय़ा चिकटवल्या. त्यातील निकोल नामक मादी आफ्रिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत जाऊन परतली. वीस हजार किमी प्रवास कोणताही हेतू न ठेवता, निव्वळ कुतूहल म्हणून करणारे महाकाय शुभ्र शार्क अद्भुत प्राणी मानले पाहिजेत!


🖊नारायण वाडदेकर

office@mavipamumbai.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- २७ एप्रिल २०२३

==============

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...