बदली

Wednesday, 8 March 2023

समुद्रातील जलचरांमुळे विषबाधा

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 समुद्रातील जलचरांमुळे विषबाधा


सागरकिनारी गेल्यावर वाळूत आणि खडकाळ किनाऱ्यावर शंख-शिंपले गोळा करण्याचा छंद अनेकांना असतो, पण आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही नियम पाळणे आवश्यक ठरते. कारण यातून इजा होऊ शकते. बहुधा किनाऱ्यावरच्या वाळूत असलेले मोकळे पांढऱ्या रंगाचे शिंपले सुरक्षित असतात; पण शंखांच्या बाबतीत ‘कोनस टेक्स्टायल’ नावाची प्रजाती धोकादायक असते. एखाद्या कापडावरील सुरेख नक्षीप्रमाणे हा शंख दिसतो. पाण्याबाहेर तो बराच काळ जिवंत राहतो. या शंखामधील विषग्रंथी एका तीक्ष्ण विषदंतामध्ये उघडते. सुईप्रमाणे अणकुचीदार असणाऱ्या त्याच्या पोकळ दातातून त्याचे विष त्वचेखाली टोचले गेल्यास विषबाधा होऊ शकते. कोनस विषबाधेमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वर्षांला सरासरी ३० एवढे आहे.


सागरकिनारी किंवा उथळ पाण्यात अधूनमधून आढळणारा एक जेलिफिशसारखा जीव फायझेलिया म्हणजेच ‘पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर’! पाण्यावर तरंगणाऱ्या या सजीवाच्या पाण्याखालील बाजूवर अनेक लांब शुंडक असतात. या शुंडकांवर असलेल्या काही दंशपेशी-समूहामध्ये हिप्नोटॉक्सिन नावाचे विष असते. या पेशीचा आपल्या त्वचेशी संपर्क आल्यास ते आपल्या चेतासंस्थेवर परिणाम करते. यामुळे पोहणारी व्यक्ती हातपाय हलवू शकत नाही. कधी कधी फायझेलियामुळे तीव्र विषबाधा होते. वाळूत असा निळसर रंगाचा प्लास्टिक पिशवीसारखा सागरी जीव आढळल्यास शक्यतो त्याला स्पर्श करू नये. पोहताना त्याचा त्वचेशी संपर्क येऊ शकतो, कारण पाण्यात त्याचे शुंडक किंवा तरंगणारा फायझेलिया त्याच्या पारदर्शकतेमुळे सहसा वेगळा दिसत नाही.


उथळ सागरी पाण्यात वालुकामय किनाऱ्यावर एक पतंगाच्या आकाराचा सपाट मासा आढळतो, तो ‘स्टिंग रे’ या नावाने ओळखला जातो. याच्या लांब शेपटावर एक काटय़ासारखा अवयव असतो. त्याला स्टिंग म्हणतात. याच्या तळाशी विषग्रंथी असते. या माशाच्या जवळ गेल्यास त्याच्या शेपटाच्या काटय़ाने केलेल्या जखमेमुळे अचानक झालेल्या वेदनेने व्यक्ती गोंधळून जाते. मुंबईत गणपती विसर्जनाच्या दिवशी स्टिंग रेमुळे जखमा झाल्याची आठवण ताजी आहे. निसर्ग-अभ्यासक स्टीव्ह आयर्विन यांचा स्टिंग रेने दंश केल्याने मृत्यू झाल्याची नोंद आहे. फायझेलिया आणि स्टिंग रे यांचा धोका सर्वत्र नसतो. पण काळजी घेणे गरजेचे असते.


🖊डॉ. मोहन मद्वाण्णा

office@mavipamumbai.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- ९ मार्च २०२३

==============

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...