🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬
🤔 कुतूहल 🤔
🎯 वैज्ञानिकांचे हवामान बदलांवर लक्ष-२
हवामान बदलाचे स्वरूप तपासणारी आणखी काही उपकरणे म्हणजे ‘चानोस- २’ नावाचे प्रोफायलर्स, पोलर सेंटीनेल्स आणि ‘डीप सी’ ही यंत्रणा. चानोस (चॅनलाइज्ड ऑप्टिकल सिस्टीम) सेन्सर्स असणारे हे उपकरण म्हणजे ‘चानोस- २’. महासागरातील विरघळलेल्या असेंद्रिय कार्बनचे त्वरित विश्लेषण करणारे हे उपकरण सामूचीही नोंद करते. जहाजाच्या डेकवरून किंवा बोयाच्या स्वरूपात, तसेच हलत्या तराफ्यावरून ही उपकरणे पाण्यात सोडली जातात. ती यांत्रिक पद्धतीने चालवता येतात, त्यामुळे शास्त्रज्ञांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी जावे लागत नाही. या उपकरणांच्या सहाय्याने महासागराच्या रासायनिक गुणधर्मात झालेल्या बदलांविषयी निरीक्षणे नोंदवली जातात.
‘पोलर सेंटीनेल्स’ ही पंख असलेल्या मिसाइलप्रमाणे भासणारी, पण त्यावर घंटा व शिटय़ा असणारी एक यंत्रणा आहे. हे स्वयंचलित उपकरण हिमनगाच्या खाली समुद्रतळाशी वेगाने जाते. हिमनगाची जाडी मोजण्यासाठी ते हजारो मैल दूर आक्र्टिक महासागरापर्यंत पोहोचते. पृष्ठभागाखाली प्रवास करते. केवळ सेल फोन इतक्याच ऊर्जेचा वापर करणाऱ्या या उपकरणाच्या पुढच्या बाजूला सोनार प्रणाली असते. सागरतळावरून ध्वनी परावर्तित होऊन त्यावरून खोलीचा अंदाज येतो. महासागराच्या गोठलेल्या पृष्ठभागाच्या अनेक मीटर खाली जाऊन हिमाची सखोल पाहणी या अत्यंत सक्षम यंत्राच्या सहाय्याने केली जाते.
खोलवर दृष्टिक्षेप टाकणारे व १००० मीटर खोली पार करणारे ‘डीप सी’ हे उपकरण म्हणजेच खेचून नेता येईल असा संवेदक तराफा आहे. याच्या साहाय्याने सागरतळाशी मंद संधिप्रकाशात असलेल्या सजीवांची संख्या मोजता येते आणि त्यांच्या प्रजाती ओळखणे सोपे होते. हे सजीव सागराच्या पृष्ठभागावरील कार्बन मोनॉक्साइड खोल पाण्यात नेतात. त्यामुळे त्यांची गणना करणे आवश्यक असते. या यंत्रणेच्या पुढच्या बाजूला चौकट असून त्याला स्टिरीओ कॅमेरा असतो. तसेच दोन सोनार उपकरणे असतात. या सोनारने तेथील सजीवांचे स्कॅनिंग आणि मॅपिंग करून त्यांच्या घनतेचा अंदाज घेता येतो. त्यांच्या जनुकीय माहितीचा अभ्यास केला जातो. ही सर्व माहिती सोनारच्या साहाय्याने मिळते. उरलेले इतर संवेदक पाण्याचा सामू, क्षारता, आणि इतर रासायनिक गुणधर्म तपासतात. जहाजावर असणाऱ्या प्रयोगशाळेतील वैज्ञानिकांना ही सर्व विदा ऑप्टिकल केबलच्या मदतीने पोहोचवून तिचे परिसंस्थेच्या शाश्वततेसाठी नियोजन करता येते. येणाऱ्या पिढय़ांसाठी हवामानबदलाचे गांभीर्य अधिक वाढले आहे, त्यामुळे आपल्या बाजूने प्रयत्न केले पाहिजेत, असा वैज्ञानिकांचा आग्रह आहे.
🖊नंदिनी विनय देशमुख
office@mavipamumbai.org
=============
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा ! ! !
📡 जय विज्ञान 🔬
संकलक - नितीन खंडाळे
- चाळीसगाव
दै_लोकसत्ता
दिनांक- २ मार्च २०२३
==============
No comments:
Post a Comment