🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬
🤔 कुतूहल 🤔
🎯 सागरी साक्षरता : महत्त्व आणि गरज
पृथ्वीच्या आरोग्यासाठी आणि मानवी कल्याणासाठी महासागर महत्त्वपूर्ण आहे. परंतु मानवामुळे सागराला अनेक धोक्यांचा सामना करावा लागत आहे. प्रदूषण, अति प्रमाणात आणि अयोग्य प्रकारे केलेली मासेमारी, हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, ऑक्सिजनची कमतरता, पाण्याचे आम्लीकरण इत्यादी कारणांमुळे, सागरी परिसंस्था अस्थिर होत आहेत. महासागराशी संबंधित समस्या समजून घेऊन त्याबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे. सागरी संसाधनांचे जतन आणि शाश्वत वापर करण्यासाठी समाजाने सागरसाक्षर असले पाहिजे. त्यासाठी मानव आणि समुद्र यांच्यातील परस्परसंबंध समजून घेणे आवश्यक आहे.
१९८६ मध्ये अमेरिकेत राष्ट्रीय विज्ञान शिक्षण मानके प्रकाशित झाली. शालेय अभ्यासक्रमातील सागर विज्ञानविषयक विषयांची कमतरता त्यामध्ये ओळखली गेली. ही तफावत दूर करण्यासाठी तेथील शास्त्रज्ञ, शिक्षक आणि धोरणकर्त्यांच्या विविध गटांच्या सहकार्याने सागरी साक्षरता (ओशन लिटरसी) ही संकल्पना मांडली गेली आणि २००४ मध्ये महासागर साक्षरता आराखडा विकसित करण्यात आला. यात सागरी साक्षरता तत्त्वे आणि ४५ मूलभूत मार्गदर्शक संकल्पना समाविष्ट आहेत. महासागर आणि महासागरातील जीवन पृथ्वीच्या वैशिष्टय़ांना आकार देते. हवामानावर समुद्राचा मोठा प्रभाव आहे. महासागराने पृथ्वीला राहण्यायोग्य ग्रह बनवले. महासागर जीवन आणि परिसंस्थेच्या मोठय़ा विविधतेला साहाय्यभूत ठरतो. महासागर आणि मानव एकमेकांशी अतूटपणे जोडलेले आहेत. संपूर्ण महासागर शोधणे अद्याप बाकी आहे. अशी ही सात तत्त्वे आहेत.
तुमच्यावरचा समुद्राचा प्रभाव आणि महासागरावरचा तुमचा प्रभाव समजून घेणे म्हणजेच सागरी साक्षरता! सागरसाक्षरता निर्माण झाल्यास समुद्राविषयी आवश्यक तत्त्वे समजून घेऊन महासागराबद्दल अर्थपूर्ण पद्धतीने संवाद साधता येतो. तसेच महासागर आणि त्याच्या संसाधनांबद्दल माहितीपूर्ण आणि जबाबदार निर्णय घेण्यास सक्षमता येऊ शकते, जेणेकरून सागरी संसाधने जपली जाऊ शकतात.
या मोहिमेने अमेरिकेच्या सीमा ओलांडल्या असून जगभरात हा प्रकल्प कार्यरत आहे. सागरी साक्षरता ही संकल्पना महासागराच्या शाश्वत भविष्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने मान्य केली आहे. सागराचे ढासळते आरोग्य सुधारण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने २०२१-२०३० हे दशक ‘महासागर विज्ञान दशक’ म्हणून घोषित केले आहे. यात महासागर साक्षरता हे संशोधन आणि विकास प्राधान्यांपैकी एक आहे.
🖊डॉ. बाळासाहेब कुलकर्णी
office@mavipamumbai.org
=============
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा ! ! !
📡 जय विज्ञान 🔬
संकलक - नितीन खंडाळे
- चाळीसगाव
दै_लोकसत्ता
दिनांक- ४ जाने २०२३
==============
No comments:
Post a Comment