🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬
🤔 कुतूहल 🤔
🎯 अंटाक्र्टिक महासागर
अंटाक्र्टिक महासागर म्हणजेच दक्षिण महासागर! २०.३ दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्र असलेला हा महासागर पृष्ठभागाच्या क्षेत्रफळानुसार चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महासागर आहे. एकूण सागरी क्षेत्रापैकी ५.६ टक्के भाग याने व्यापला आहे. अटलांटिक, हिंदी आणि पॅसिफिक महासागर अंटाक्र्टिकाभोवती बर्फाळ पाण्यात विलीन होतात. याला अंटाक्र्टिक किंवा दक्षिण महासागर समुद्रद्रोणी म्हणजेच बेसिन म्हणतात. भूगोलतज्ज्ञ अनेक दशके या सागराच्या अस्तित्वावर असहमत होते. तथापि, ‘आंतरराष्ट्रीय हायड्रोग्राफिक ऑर्गनायझेशन’ने दक्षिण महासागराचे वर्णन जागतिक महासागराचा दक्षिणेकडील भाग म्हणून केले आणि त्याला स्वतंत्र दर्जा मिळाला. अंटाक्र्टिका आणि दक्षिण अमेरिका ३४ दशलक्ष वर्षांपूर्वी वेगळे होऊन ड्रेक अभिक्रमण (पॅसेज) तयार झाला. त्याच सुमारास अंटाक्र्टिका तयार झाला असावा.
याची खोली चार ते पाच हजार मीटरच्या (१३ ते १६ हजार फूट) दरम्यान आहे, पण त्याच्या बहुतेक भागांमध्ये उथळ पाण्याचे मर्यादित क्षेत्र आहे. त्यात अॅमंडसेन समुद्र, बेलिंगशॉसेन समुद्र, ड्रेक पॅसेजचा भाग, रॉस समुद्र, स्कॉशिया समुद्राचा एक छोटासा भाग आणि वेडेल समुद्र यांचा समावेश होतो. पोषक तत्त्वे आणि ऑक्सिजनने समृद्ध पाणी असणाऱ्या दक्षिण महासागरात शक्तिशाली प्रवाह आणि अति थंड तापमान, असते. परिणामी हा भाग पृथ्वीवरील सर्वात उत्पादक सागरी परिसंस्थांपैकी एक मानला जातो. उन्हाळय़ात अंतराळातून निरीक्षण करता येईल इतपत कोटय़वधी सूक्ष्म एकपेशीय वनस्पतीप्लवक या समुद्राच्या पृष्ठभागावर पसरलेले दिसतात. या एकपेशीय सागरी वनस्पतींवर अंटाक्र्टिक क्रिल आणि इतर लहान प्राणी उदरभरण करतात.
जगातील प्रमुख महासागरांचे पाणी इथे मिसळले जाते. त्यामुळे दक्षिण महासागर जगभरातील सागरी पाण्याच्या अभिसरणात महत्त्वाची भूमिका बजावतो. यातील प्रवाह, हंगामी बर्फ वातावरणातील उष्णता आणि कार्बन डायऑक्साइड शोषून पृथ्वीच्या हवामानाचे नियमन करण्यातही मोलाचा हातभार लावतात. पेंग्विन, सील आणि व्हेल येथे सहज आढळून येतात. हे प्राणी येथील परिसंस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत. याशिवाय पाण्याच्या आणि बर्फाच्या खाली, फक्त अंटाक्र्टिकामध्ये आढळणारे काही जलचर आहेत.
इतर मोठय़ा महासागरांच्या तुलनेत दक्षिण महासागरात मासे कमी आहेत. स्नेलफिश ही प्रजाती सर्वात मुबलक आहे, त्याखालोखाल इलपाउट आणि कॉड आइसफिश अशा तीन प्रजाती या समुद्रात असणाऱ्या एकूण माशांपैकी ९० टक्के प्रमाणात असतात. संधिपाद आणि मृद्काय यांसारखे असंख्य अपृष्ठवंशीय या समुद्राच्या तलस्थ समुदायाचा मोठा भाग आहेत. येथील खडकाळ किनाऱ्यांवर अनेक सागरी पक्षी घरटी बांधतात. प्रत्येक प्रजाती येथील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी विशिष्ट अनुकूलन दर्शवते.
🖊डॉ. बाळासाहेब कुलकर्णी
office@mavipamumbai.org
=============
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा ! ! !
📡 जय विज्ञान 🔬
संकलक - नितीन खंडाळे
- चाळीसगाव
दै_लोकसत्ता
दिनांक- १८ जाने २०२३
==============
No comments:
Post a Comment