बदली

Monday, 2 January 2023

सागर विज्ञान

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬

     🤔 कुतूहल 🤔


🎯 सागर विज्ञान



कुतूहल सदराचे हे १८वे वर्ष असून या वर्षभरात आम्ही तुम्हाला ‘सागर विज्ञान’ या विषयावरील लघु-लेखांतून जगभरच्या सर्व महासागर, सागर, उपसागर आणि सामुद्रधुनी याबद्दलची भौगोलिक माहिती, त्यांची वैशिष्टय़े, सागराचा आणि हवामानाचा संबंध, सागरातील जलचर, त्यांचे जीवन कसे असते, ते सांगणार आहोत. सागराची खोली काही मीटरपासून काही किलोमीटपर्यंत असल्याने तेथे राहणाऱ्या जलचरांत काय फरक असतात, हेही आपल्याला यातून समजेल.


मनुष्यप्राणी सागरावर अवलंबून आहे. दरवर्षी पडणारा पाऊस आणि त्यामुळे होणाऱ्या अन्नउत्पादनावर  मानवाचे खाद्यजीवन आधारित आहे. शाकाहारी लोकांना जेवढय़ा विविध भाज्या मिळतात, त्याच्या कितीतरी पट अधिक माशांच्या जाती सागरात उपलब्ध आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विज्ञाननिष्ठ निबंधात म्हटले आहे की, मत्स्याहारी लोकांना शाकाहारी बनवू नका, कारण त्यांना खायला घालायला तेवढय़ा भाज्या नाहीत.


हवामान बदलामुळे सागरावर होणारे परिणाम, समुद्राच्या तळाखाली भूकंप झाला तर त्सुनामीमुळे होणारा हाहाकार, याचीदेखील माहिती या सदरात दिली जाईल. समुद्र हा विश्वाच्या उत्पत्तीतील सुरुवातीच्या काही साक्षीदारांतील एक कसा आहे, जुन्या काळापासून जगाचा व्यापार समुद्रमार्गे कसा होत आहे, समुद्र प्रवास सुखकर व सुरक्षित होण्यामागची कारणे काय आहेत, समुद्र पर्यटन आणि सुरक्षा, समुद्र विज्ञानाच्या संशोधन संस्था, संशोधक, नौका व इतर उपकरणे, समुद्र विज्ञानाच्या पुस्तकांची ओळख, समुद्राविषयी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदा, सागरविषयक कायदे, समुद्राचे प्रदूषण या सर्व गोष्टी आपल्याला या सदरातून वाचायला मिळतील.


मराठी विज्ञान परिषदेने ‘लोकसत्ता’मधील कुतूहल सदरात पूर्वीच्या १७ वर्षांत, निसर्ग आणि विज्ञान, गणित, वनस्पतीशास्त्र, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, खगोलविज्ञान, वैज्ञानिक संकल्पना, सुरक्षितता, मोजमापन, पर्यावरण इत्यादी विषय हाताळले. या सदरात वर्षांकाठी साधारण ३०० शब्दांचे २५० लेख सचित्र छापून येतात. अनेक शिक्षक आणि विद्यार्थी या सदरातील लेख कापून एका वहीत चिकटवतात व नंतर संदर्भ म्हणून वापरतात. त्यामुळे  यातील लेख माहितीच्या दृष्टीने अचूक असावेत आणि लेखांची भाषा सोपी आणि समजायला सुलभ असावी याबद्दल मराठी विज्ञान परिषद सतर्क राहील. 


  🖊अ. पां. देशपांडे

office@mavipamumbai.org

www.mavipa.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- २ जाने २०२३

==============

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...