बदली

Wednesday, 21 December 2022

मराठी भाषा मुमूर्षू आहे का?

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 मराठी भाषा मुमूर्षू आहे का?


‘‘मराठी भाषा मुमूर्षू आहे का?’’ असा प्रश्न १९२६ मध्ये वि. का. राजवाडे यांनी विचारला होता. अर्थात या प्रश्नातून त्यांना मराठी भाषा मुमूर्षू म्हणजे मरणासन्न आहे, असंच अप्रत्यक्षपणे सुचवायचं होतं. त्यानंतर मराठीच्या तब्येतीत अनेक चढउतार झाले. आज सुमारे १०० वर्षांनंतर हा मराठीतला लेख आपण एका मराठी वृत्तपत्रात, छापील किंवा ऑनलाइन स्वरूपात वाचत आहोत, तरीही या प्रश्नाला ठामपणे ‘नाही’ असं उत्तर द्यायला आपण चाचरतो.


ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची अद्ययावत प्रत प्रसिद्ध झाली की, यावर्षी ‘ओईडी’ने किती नवीन शब्द घेतले अशी चर्चा आपण कौतुकाने वाचतो. तुलना नको, पण सहजच विचार केला तर गेल्या २५ वर्षांतल्या मराठीतल्या एखाद्या अद्ययावत कोशाचं नाव, अधिकृतरीत्या घेतलेले नवीन शब्द सांगता येतील? गुगल भाषांतर ही इतर भाषांमधलं ज्ञान आपल्या भाषेत आणण्यासाठी जादूची किल्ली आहे. पण ही एक उपयुक्त सुविधा आज आपण केवळ विनोदाचं साधन म्हणून वापरतो. भाषांतराचे विनोद किंवा वृत्तपत्रीय मजकुरातल्या चुका पाहून मनोरंजन करून घेण्यापेक्षा त्यात दुरुस्त्या व्हाव्या म्हणून एकतरी पाऊल का उचलत नाही?


मराठीसाठी मुद्रितशोधन, संदर्भ उपलब्धता, शब्दनिधी संकलन अशा अनेक कामांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची मदत होऊ शकते. यासाठी भाषाअभ्यासकांनी अभिनिवेश सोडून अशा भविष्यवेधी, कृतियुक्त कामांवर लक्ष केंद्रित करण्याची नितांत गरज आहे. विकिपीडिया या ज्ञानकोशाच्या व्यासपीठावरच्या भाषानोंदी पाहिल्या तर इंग्रजी- ६६ लाख, चिनी- १३ लाख, जपानी- १३ लाख, फिनिश- पाच लाख, कोरियन- सहा लाख आणि मराठी- ८८ हजार (संदर्भ- देशोदेशीचे शालेय शिक्षण- पान क्र. २६६) अशी दारूण परिस्थिती दिसते. इंग्रजी किंवा इतर भाषांची रेघ मोठी दिसते म्हणून विलाप करण्यापेक्षा मराठीची रेघ मोठी व्हावी याकडे पाहायला हवं. जोपर्यंत महाराष्ट्रात आणि जगाच्या पाठीवर मराठी समाज असेल, तोपर्यंत तो जी भाषा बोलेल ती मराठीच असेल. मात्र तेव्हा राजवाडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ‘नाही’ असं उत्तर द्यायचं असेल तर ती तयारी आजपासूनच करायला हवी.


🖊 वैशाली पेंडसे-कार्लेकर

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

दिनांक- २२ डिसेंबर २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...