बदली

Monday, 7 November 2022

जितेपणी देईना पाणी, मग बसला तर्पणी

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 जितेपणी देईना पाणी, मग बसला तर्पणी


बापूसाहेब तसा तालेवार माणूस. खूप सामाजिक कामे करणारा. गोरगरिबांसाठी मनात खूप कळवळा असणारा. पण किती दिवस शरीर तरी साथ देणार? वार्धक्याने त्यांना शेवटी गाठलेच. दोन मुले होती त्यांना. एक सद्शील पण परदेशी वास्तव्याला. आणि दुसरा त्यांच्याजवळच राहात असे, मात्र तो होता दुर्वर्तनी. सगळय़ा गावाला बापूसाहेबांची काळजी असे, पण हा मुलगा त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नसे. आपल्या पित्याच्या चांगुलपणाची त्याला जाणच नव्हती जणू किंवा जिथे पिकते तिथे विकत नाही, हेच खरे! बापूसाहेब आता पूर्णपणे अंथरुणाला खिळले होते. त्यांना आता दुसऱ्याच्या आधाराची खरोखरीच गरज होती. पण हे चिरंजीव त्यांची काही विचारपूस करतील तर शपथ. परदेशातला मुलगा दुरून का होईना काहीतरी विचारपूस तरी करत होता, पण जवळ राहात असणाऱ्या मुलाला मात्र त्यांच्या तब्येतीविषयी काहीच सोयरसुतक नव्हते. सर्व लोक त्यांच्या या स्थितीबद्दल हळहळत होते, पण काही करू शकत नव्हते. अशा अवस्थेत बापूसाहेब मात्र देवाकडे रोज आपल्या मरणाची भीक मागत होते. पण मरण काय कोणाच्या हातात असते थोडेच. अखेर देवाने त्या पुण्यात्म्याची प्रार्थना ऐकली. त्यांना शांतपणे मरण आले आणि नंतर मात्र चिरंजिवांचे पितृप्रेम खूपच उफाळून आले. परदेशातल्या चिरंजीवांनी आपल्या भावाला कळवले, ‘बापुसाहेबांचे सर्व मरणोत्तर विधी अगदी साग्रसंगीत कर. पैशाची काळजी करू नकोस. मी पैसे पाठवतो.’ मग काय दहाव्या, बाराव्याला गाव जेवणे घातली गेली. सारे कसे साग्रसंगीत आणि यथास्थित पार पडले. पण लोक मात्र कुजबुजू लागले, ‘जितेपणी देईना पाणी, मग बसला तर्पणी’ अशातली गत आहे यांची! काय बोलायचं? असला देखावा न मांडता वेळीच त्यांची सेवा मनोभावे केली असती तर जात्या जिवाला जरा बरे तरी वाटले असते! जीवनातले कटू सत्य सांगणारी ही म्हण आहे. बघा तुम्हाला या अर्थाच्या आणखी काही म्हणी आठवतात का?


  🖊डॉ. माधवी वैद्य

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

दिनांक- ८ नोव्हेंबर २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...