बदली

Wednesday, 9 November 2022

अनुवादावरील इंग्रजीचा प्रभाव

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 अनुवादावरील इंग्रजीचा प्रभाव


‘अगं, येताना तू काही वस्तू आणू शकशील का?’, मैत्रिणीचा संदेश पाहून मी लिहिलं, ‘हो. शकेन, शकेन.’ यातला गमतीचा भाग सोडा, पण विनंतीवजा वाक्यांसाठी मराठीत ‘शकणे’ हे सहायक क्रियापद वापरणं आता बरंच रूढ झालं आहे. इंग्रजीतल्या ‘कॅन’चा हा प्रभाव आहेच, पण त्याचबरोबर या वाक्यरचनेमुळे आपल्या बोलण्यात किंवा लिहिण्यात सौजन्य व्यक्त होतं ही भावनाही आहे.


वृत्तपत्रे, वाहिन्या, मनोरंजन, जाहिराती अशा अनेक क्षेत्रांमध्ये अनुवादाची प्रक्रिया मोठय़ा प्रमाणावर घडते आहे. साहित्य वगळता बाकी क्षेत्रांमध्ये अत्यंत कमी कालमर्यादा असल्याने घाईघाईने केलेले अनुवाद, संपादन किंवा पुनर्तपासणीचा अभाव अशा अनेक कारणांनी बरेचदा शब्दश: भाषांतर होऊन इंग्रजीच्या धर्तीवर वाक्यरचना होते. ‘तो मुलगा, ज्याचे केस लाल आहेत.’ किंवा ‘जर आपल्याकडे दूरदृष्टी असेल तर..’ अशा ‘जर..तर’, ‘ज्यामुळे ..त्यामुळे’ असलेल्या वाक्यरचनांचं प्रमाण वाढलेलं दिसतं. ‘मला खात्री आहे, की तुम्ही याल.’ किंवा ‘तो आला नाही, कारण पाऊस आला.’ अशाप्रकारच्या मिश्र किंवा संयुक्त वाक्यरचनाही मोठय़ा प्रमाणावर दिसतात. जाहिरातींच्या अनुवादात बरेचदा विभक्तिप्रत्यय आणि सामान्यरूपांकडे लक्ष दिलं जात नाही, शिवाय, विभक्तिप्रत्यय आणि शब्दयोगी अव्यय सुटे लिहिणं असंही घडतं. असा मजकूर सतत वाचून-लिहून या बदलांचा प्रभाव आता अनुवादाव्यतिरिक्त मूळ मराठी लेखनात आणि बोलण्यात दिसू लागला आहे. ‘विद्यार्थ्यांकडून झेंडे लावले गेले.’ अशा कर्त्यांला ‘कडून’  प्रत्यय लागलेल्या वाक्यरचनेला पूर्वी आपण ‘नवीन कर्मणी’ अशा नावाने स्वीकारलं. आता सद्य वाक्यरचनांचाही नव्याने अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे.


  🖊वैशाली पेंडसे-कार्लेकर

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

दिनांक- १० नोव्हेंबर २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...