भाषासूत्र, दै.लोकसत्ता
🎯 साधे-सोपे प्रतिशब्द
जेव्हा आमच्याकडे कामाला येणाऱ्या मावशी, कौतुकाने सांगतात की कष्टपूर्वक त्यांनी त्यांच्या मुलीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले आहे, त्यांना इंग्रजी येत नाही म्हणून तिला शिकवणीही लावली आहे, तेव्हा त्यांना काही सांगायला जाणे म्हणजे त्यांच्या उत्साहावर विरजण पाडण्यासारखे असते. आणि त्या समाजाच्या ऊर्ध्वगामी गती प्रमाणेच वागत असतात, त्यांची तरी काय चूक?
इंग्रजी माध्यमातील अनेक विद्यार्थी मातृभाषेच्या ज्ञानापासून वंचित राहतात. एक कोरडे देवघेवीचे साधन म्हणून ते मराठी वापरतात. मराठीतील संदर्भ पोषणाची शक्ती त्यांना दिसत नाही, दिसत नाही म्हणण्यापेक्षा गवसत नाही. आणि अपुऱ्या भाषिक कौशल्यांनिशी ते आपला भाषा व्यवहार भागवतात. अगदी साध्या साध्या रोजच्या वापरातल्या परकीय शब्दांना पर्यायी मराठी शब्द कोणते देता येऊ शकतात पाहूया.
अॅलर्जी- वावडे, नोटीस- सूचना, दखल, जाणीव, नोटिफिकेशन- अधिसूचना, नोट- अधिटिप्पणी, चिठ्ठी, नोंद, ऑफिस- कार्यालय, ऑर्डर- आदेश, ओरिजनल- मूळचा, ओरिजिन- मूळ, अदरवाइज- अन्यथा, ऑर्डिनरी- सर्वसामान्य, सामान्य, साधारण, पेपर्स- कागदपत्रे, पेपर करन्सी- कागदी चलन, पेटंट- एकस्व, स्वामित्व. पार्टनर- भागीदार, पार्शिअॅलिटी- पक्षपात, प्लेट- ताटली, थाळी, प्रिमिअम- अधिमूल्य, विम्याचा हप्ता, प्रोबेशन- परिवीक्षा, पब्लिक स्ट्रीट- सार्वजनिक रस्ता, क्वालिफिकेशन- अर्हता, विशेष, क्वालिटी- दर्जा, कोटेशन- दरपत्रक, रिमार्क- शेरा, अभिप्राय, राइट- अधिकार, हक्क, सॅलरी- वेतन, सबस्क्राईब करा- वर्गणीदार व्हा, लाईक- शेअर- कमेंट- आवडले, सामायिक केले, टिप्पणी केली असे साधे साधे शब्द रोजच्या वापरात आणले तर ते रुळू शकतात.
संदर्भानुसार शब्दाचे अर्थ बदलतात हे मुलांना खेळातून शिकवता येऊ शकते. सिस्टर हा शब्द चर्चमध्ये वेगळा, घरात वेगळा आणि दवाखान्यात वेगळा. नेहमीची पार्टी वेगळी आणि कायद्यामध्ये पार्टी म्हणजे पक्षकार, चित्रपटगृहात स्क्रीनिंग म्हणजे दाखवणे आणि न्यायव्यवस्थेत बचाव करणे किंवा लपवणे. मराठी भाषेची श्रीमंती अमाप आहे, ती भरपूर लुटली तर लुटणारा आणि पदरी पाडून घेणारा दोघेही सांस्कृतिकदृष्टय़ा धनवान होतील, यात शंका नाही.
🖊 डॉ. निधी पटवर्धन
==============
संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव
दिनांक- १७ नोव्हेंबर २०२२
No comments:
Post a Comment