बदली

Thursday, 3 November 2022

कायद्याचं बोला मराठीत!

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 कायद्याचं बोला मराठीत!


दरवर्षी मला जिल्हा न्यायालयात मराठी भाषादिनाला काहीतरी भाषण द्यावं असं आमंत्रण येतं. तेव्हा एकदा मी त्यांना विचारलं, ‘‘आपल्या न्यायालयात मराठीतून किती व्यवहार केला जातो?’’ यावर, ‘‘आम्हाला मराठीपेक्षा इंग्रजी सोपं पडतं,’’ असं उत्तर  न्यायाधीश महोदयांनी दिलं, इतर दिवाणी न्यायाधीशांनी त्याला दुजोरा दिला. शासनाने दिनांक २१ जुलै १९९८ रोजी एक अधिसूचना काढून राज्यातील सर्व फौजदारी व दिवाणी न्यायालयांची भाषा मराठी असेल असे घोषित केले आहे. त्यासाठी भाषा संचालनालयाने तयार केलेला ‘न्याय व्यवहार कोश’ हा न्यायव्यवहाराची परिभाषा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल होते. भाषा संचालनालयाने सिद्ध केलेली विविध विषयांची परिभाषा रूढ आणि लोकप्रिय करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे, होय ना!


अर्थात कोश उपलब्ध करून दिले म्हणजे लगेच सगळा न्यायव्यवहार मराठीतून होईल असे नाही, हे माहीत असूनही एक पाऊल उचलले गेले हे महत्त्वपूर्ण आहे. ज्या शब्दांना आपण सहज व नियमित इंग्रजीत उच्चारत असतो, त्याला पर्यायी काय शब्द उपलब्ध होऊ शकतात हे पाहू या. अ‍ॅबस्ट्रॅक्ट – संक्षिप्त उतारा /संक्षेप /गोषवारा /सारांश. अ‍ॅक्ट ऑफ लॉ – विधिक्रिया, अफेअर्स – कारभार/व्यवहार, अँबॅसडर – राजदूत, आर्बिट्रेशन – लवाद/लवाद निर्णय, असेट्स अँड लायबिलिटीज – मत्ता आणि दायित्व, ऑक्शन – लिलाव, ऑडिट – लेखापरीक्षा, ऑडिटर – लेखापरीक्षक, बार असोसिएशन – वकील अधिसंघ, बार कौन्सिल – वकील परिषद, बेस कोर्ट – तल न्यायालय, सिविल मॅटर – दिवाणी बाब, चीफ जज – मुख्य न्यायाधीश, चीफ जस्टिस – मुख्य न्यायमूर्ती, चीफ मॅजिस्ट्रेट – मुख्य दंडाधिकारी, क्लेम ऑफ ओनरशिप – स्वामित्वाचा दावा किंवा मालकीचा दावा, रिट- प्राधिलेख, क्लिअरिंग अ बिल – विपत्राचे समाशोधन, क्लीअरिंग हाउस – समाशोधन गृह, कोड – संहिता, कॉमन लॉ – प्रारूढ विधी, कंडिशनल पेमेंट – सशर्त प्रदान, कॉनकॉर्ड – तहनामा, कंडोन् – क्षमापित करणे


सुचवलेले पर्यायी शब्द कळायला अजिबात कठीण नाहीत, पण वापरण्यास अंगवळणी पडणे ही महाकठीण पण प्रयत्नसाध्य गोष्ट आहे.


🖊 डॉ. निधी पटवर्धन

nidheepatwardhan@gmail.com

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

दिनांक- ३ नोव्हेंबर २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...