🤝 साम्ययोग : दै.लोकसत्ता
📖कृतयुगी ब्रह्मपुत्र
कलि: शयानो भवति संजिहानस्तु द्वापर:।उत्तिष्ठस्त्रेता भवति कृतं संपाद्यते चरंश्चरैवेति॥(ऐतरेय ब्राह्मण, अध्याय ३, खण्ड ३)
अर्थ : कलियुगात माणूस झोपलेला असतो. पूर्ण जाग आली की तो द्वापार युगात वावरतो. उठून उभा राहिला की तो त्रेता युगात असतो आणि चालायला लागला की त्याचा कृतयुगात समावेश होतो. यासाठी बाबा रे, तू चालत राहा.
विनोबांच्या भूदान यात्रेचे ऐतरेय ब्राह्मणाशी काहीसे वेगळे नाते आहे. या मंत्रात युगांचे उल्लेख लक्षणांवरून आले आहेत. कृतयुगातून कलियुगात जायला आणि हेच उलट, माणसाला फार वेळ लागत नाही. स्वातंत्र्य आंदोलनात गांधीजींनी चरख्याच्या तर स्वराज्यात विनोबांनी भूदान यात्रेच्या माध्यमातून या देशाला कृतिप्रवण केले.
विनोबांच्या भूदान यात्रेला आध्यात्मिक, सामाजिक आणि आर्थिक संदर्भ होता; तसेच त्यांच्या वृत्तीमधे भटकंतीबद्दल एक विशेष आस्था होती. फिरणे ही त्यांची आवड होतीच. शिवाय ते सदैव हालचाल करत. काही ना काही काम करत. ‘विनोबांची काया चंचल तर प्रज्ञा स्थिर होती,’ हे स्व. कमलनयन बजाज यांनी विनोबांच्या व्यक्तित्वाचे केलेले वर्णन त्यामुळेच अगदी यथार्थ म्हणावे लागते. स्वत: विनोबाही म्हणत, ‘मैं बापू का पाला हुआ एक जंगली जानवर हूँ।’
जंगली म्हणजे जंगलात बालपण घालवलेला. त्यांच्या लहानपणी कोकण जंगलासारखेच होते. त्यांच्या अध्ययनाचा विषय उपनिषदे म्हणजे अरण्यातून आलेला होता. भारतीय परंपरेचा हा भाग एखाद्या जंगलाहून कमी नाही. विनोबा गांधीजींच्या संगतीत आले नसते तर ते बहुधा कधी समाजाळले असते का ते सांगणे कठीण आहे. बापूंनी त्यांना एकांतातून लोकांमध्ये आणले. तरीही ‘पाला हुआ एक जंगली जानवर’ या शब्दांत त्यांनी आपली निरंकुशता अधोरेखित केली आहेच. सारांश, त्यांच्या वर्तनाला बंधन होते पण वृत्ती मोकळी होती.
विनोबांची पायी फिरण्याची आवड किती उत्कट होती हे त्यांच्या एका पत्रावरून जाणवते. वाईहून पायी ते पुण्याला आले. त्यांना लोकमान्यांचे दर्शन घ्यायचे होते. या प्रवासाविषयी गोपाळराव काळे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी ‘पायी प्रवासाचा आनंद हा ज्ञानेश्वरीपेक्षाही सरस आहे’ अशा आशयाचा मजकूर लिहिल्याचे आढळते. वाई परिसरात भटकंती करतच त्यांनी आपले गीता चिंतन लोकांसमोर ठेवले.
नीर बहता भला। साधु रमता भला।।असे म्हटले जाते. परंतु हा साधु पाण्याप्रमाणेच वाहता होता. अगदी अंधारकोठडीतही ते साधारणपणे आठ कि.मी. चालत.विनोबांची ही भ्रमंती आणि त्यांचे कार्य पाहिले की ब्रह्मपुत्रा स्मरण होते. आरंभीची ब्रह्मपुत्रा नदी नंतर इतकी विस्तारते की तिचा एक ‘नद’ बनतो. विनोबांचा समत्वनिष्ठ साधू ते समाजाभिमुख साम्ययोगी हा प्रवास असाच आहे.
साने गुरुजींच्या ‘आश्रमाबाहेर पडा’ या विनंतीवर व्यक्त होताना ‘माझ्याही पायाला भोवरा आहे,’ ही विनोबांची प्रतिक्रिया होती. नेमके काय करायचे हे तोवर विनोबांनी ठरवले नसावे; तथापि ते कसे करायचे याची त्यांना खात्री होती. वृत्ती आणि श्रद्धा या दोहोंच्या आधारे विनोबांनी पदयात्रा पार केली आणि त्याचवेळी भूदानाची दीक्षा देण्यासाठी आवश्यक तो अधिकारही मिळवला.
🖊अतुल सुलाखे
jayjagat24@gmail.com
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
संकलन:सुनील द. महामुनी, भूम
दिनांक- २४ऑक्टोबर २०२२
No comments:
Post a Comment