बदली

Wednesday, 19 October 2022

प्रादेशिक बोलींमधील वाक्प्रचार

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 प्रादेशिक बोलींमधील वाक्प्रचार


भाषा दर १२ कोसांवर बदलते, असे म्हणतात. अर्थातच मराठीच्याही काही प्रादेशिक बोली आहेत. त्यांत वेगवेगळे वाक्प्रचार रूढ आहेत. ‘महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश’ या द्विखंडात्मक कोशात संपादक दाते- कर्वे यांनी काही प्रादेशिक बोलींमधील वाक्प्रचार समाविष्ट केले असून विशिष्ट बोलीचा उल्लेख पुढे कंसात संक्षेपाने केला आहे. त्यातील ही काही उदाहरणे आहेत.


‘शेत खाल्लं लोधडीनं अन् मार खाल्ला गधडीनं’ हा अहिराणी बोलीतील अनुप्रासयुक्त वाक्प्रचार आहे. लोधडी म्हणजे नीलगाय होय. त्यामुळे याचा अर्थ ‘गुन्हा एकाने केला आणि शिक्षा दुसऱ्याला’, असा होतो.

‘भोके बुजणे’ या अहिराणी बोलीतील वाक्प्रचाराचा अर्थ आहे, कर्जातून मुक्त होणे.


‘कानात भेंडे घालणे’ या वऱ्हाडी वाक्प्रचाराचा अर्थ आहे, बहिरेपणाचे सोंग घेणे, मुद्दाम दुर्लक्ष करणे. भेंड म्हणजे कानाच्या पाळीत दागिना घालावयाला पाडलेले छिद्र मोठे करण्यासाठी त्यात घातलेला बोरूचा तुकडा. तो तुकडा जर कानात घातला, तर कसे ऐकू येणार? असा त्याचा अर्थ दिसतो. ‘घांटीवर येणे’ हाही वऱ्हाडी वाक्प्रचार रूढ आहे. घांटी म्हणजे गळा, नरडे. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, जिवावर बेतणे.

‘टापर वाजणे’ या नागपुरी वाक्प्रचाराचा अर्थ आहे दिवाळे निघणे. टापर म्हणजे आघात. ‘चाटूचा पऱ्या करणे’ हाही नागपुरी वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ आहे, उधळपट्टी करणे आणि ‘नाव डहाळ होणे’, याचा अर्थ आहे, बदनाम होणे.


‘गोंडा हालणे/ झुलणे’ या कोकणी वाक्प्रचाराचा अर्थ आहे, सतत काम सुरू ठेवणे. हा वाक्प्रचार चेष्टेने बोलताना वापरला जातो. कुडाळ भागातील/ मालवणी बोलीतील ‘कांडप काढणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, मारझोड करणे आणि ‘कैंगटीला येणे’ याचा अर्थ आहे, मेटाकुटीला येणे, त्रासणे!


मराठीमध्ये प्रादेशिक बोलीतील साहित्याला स्थान मिळत आले आहे. (उदा. बहिणाबाईंच्या कविता) त्यात वाक्प्रचारांचे नेटके उपयोजन केलेले असते. त्यातील वाक्प्रचारांची नाळ काही वेळा भू-सांस्कृतिक वैशिष्टय़ांशी जोडलेली असते. त्यांच्यामुळे मराठीचा परीघ विस्तार पावत समृद्ध होतो.


🖊 डॉ. नीलिमा गुंडी

nmgundi@gmail.com

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

दिनांक- १९ ऑक्टोबर २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...