बदली

Monday, 19 September 2022

घरच्या चिंचेने दात आंबतात

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 घरच्या चिंचेने दात आंबतात


काही माणसांना घरातले काहीच पसंत पडत नाही, पण बाहेरच्या गोष्टी मात्र त्यांना गोड लागतात. या माणसांचा स्वभावच असा असतो की घरची चिंच त्यांना आंबट लागते पण तीच चिंच बाहेरच्यांची असेल तर गोड लागते. वास्तविक सगळीकडची चिंच चवीला सारखीच. घरची ती नावडती आणि बाहेरची मात्र आवडती असा मथितार्थ!


चिंचेविषयीची ही म्हण आता घराघरातून वापरात आणावी लागेल अशी आहे. घराघरात आजकाल हा एक ठरलेला वाद असतो. आणि तो वाद बहुदा घरातली आई आणि तारुण्यात आलेली मुले यांच्यामध्ये विशेषत्वाने होतो. आईने काहीही करावे आणि मुलांच्या पसंतीला ते उतरू नये ही गोष्ट आता नित्याचीच झालेली आहे. आईच्या हातच्या थालीपीठाची जागा आता पिझ्झ्याने घेतलेली आहे. एक काळ असा होता, की दमून भागून घरी आल्यावर आजीने भरवलेला दहीभात खाऊन मन आणि क्षुधा दोन्ही गोष्टी तृप्त होत असत. पण आता तसे होत नाही. घराघरातून ती आजी आणि तिने कालवलेला तो दहीभात, दोन्ही गोष्टी कुठे गायबच झालेल्या आहेत. सगळय़ा घरातून अशी स्थिती असेल असे नाही, पण बहुतेक घरातून आज अशीच स्थिती आहे हे नाकारून चालणार नाही. घरी केलेली पुरणपोळी, कांद्याची भजी, त्यांचा तो खमंग वास, ते गरम गरम थालीपीठ.. त्यावरचा तो लोण्याचा गोळा..ती लिंबाच्या लोणच्याची फोड, सारे सारे या नवीन पिढीच्या धावपळीच्या जीवनात हरवून जाणार की काय, अशी शंका घेण्यास भरपूर वाव आहे असेच म्हणावे लागेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या वस्तू पैसे टाकून मिळतील हो; पण आईच्या, आजीच्या हाताची चव, ती लज्जत कशी मिळणार? मग एखाद्या नातवंडाच्या पाठीत धपाटा घालून आजी म्हणणारच ना त्याला, की बरोबरच आहे रे, ‘घरची चिंच तुला आंबटच लागणार बाबा! घरचं ते आळणी आणि बाहेरचं ते मिठ्ठापाणी!’


🖊डॉ. माधवी वैद्य

madhavivaidya@ymail.com

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

दिनांक- २० सप्टेंबर २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...