बदली

Tuesday, 13 September 2022

वाक्प्रचार : थोडे ‘सिंहावलोकन’

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 वाक्प्रचार : थोडे ‘सिंहावलोकन’


मनुष्यप्राण्याला भोवतालच्या प्राण्यांविषयी कुतूहल असतेच! भाषाविकासाच्या वाटचालीचे सिंहावलोकन केले की पाळीव प्राण्यांपासून जंगली श्वापदांपर्यंत अनेकांनी वाक्प्रचारांमध्ये कसे स्वत:चे ठसे उमटवले आहेत, हे लक्षात येते.

सिंहावलोकन करणे’ हा वाक्प्रचारच लक्षात घेऊ या! सिंहाच्या एका लकबीवरून हा वाक्प्रचार रूढ झाला आहे. सिंह चालताना आपण किती वाटचाल केली, याचा अंदाज घेण्यासाठी मध्येच मागे वळून बघतो. मानवी व्यवहारातही ही कृती अनुकरणीय ठरली आहे. त्यामुळे एखादे काम करताना आपल्या वाटचालीचे परीक्षण करून पुढची दिशा ठरवण्याची मर्मदृष्टी घेणे, असा त्याचा सुचवलेला अर्थ ठरतो.


‘ताटाखालचे मांजर होणे’ म्हणजे मिंधे होणे. पाळीव प्राण्यांमध्ये आपल्या मोहक हालचालींमुळे मांजर लाडकी असते. मात्र तिच्या जिभल्या चाटण्याच्या सवयीमुळे बहुधा हा वाक्प्रचार रूढ झाला असावा. लोकमान्य टिळकांनी आपल्या एका लेखात ब्रिटिश सरकारला सुनावले होते : ‘आमच्या युनिव्हर्सिटय़ा, कॉलेजे, सरकारच्या ताटाखालची मांजरे होत.’


‘गेंडय़ाचे कातडे पांघरणे’ म्हणजे निगरगट्ट असणे होय. गेंडय़ाच्या अंगावरची त्वचा तीन घडय़ा असलेली, जाड जणू चिलखतासारखी असते. त्यामुळे त्याची कातडी इतर प्राण्यांपेक्षा बधिर असते. म्हणून हा वाक्प्रचार रूढ झाला. उदा. जातिवंत लेखकाला गेंडय़ाची कातडी पांघरून समाजात वावरता येत नाही.


‘शेपूट हलवणे’ हा वाक्प्रचार ऐकताना कुत्र्याची आठवण येते. कुत्रा हा पाळीव प्राणी आहे. तो धन्यापुढे शेपूट हलवत लाडीगोडी करत असतो. त्यामुळे शेपूट हलवणे म्हणजे खुशामत करणे, असा अर्थ रूढ झाला आहे. ‘घोडामैदान जवळ येणे’, हा वाक्प्रचार देखील रूढ आहे. याचा अर्थ आहे, परीक्षेची वेळ जवळ येणे. घोडय़ाची चाल पारखण्यासाठी त्याला मैदानात नेतात. तेथे त्याची परीक्षा केली जाते. त्यामुळे हा वाक्प्रचार व्यापक अर्थाने कसोटीची वेळ जवळ येणे असा अर्थ सुचवतो. उदा. उमेदवारांना निवडणुकांच्या वेळी घोडामैदान जवळ असल्याची जाणीव होत असणार.


प्राण्यांच्या स्वभाववैशिष्टय़ांचे निरीक्षण करून योजलेले असे वाक्प्रचार भाषा समृद्ध करण्याचे काम करत आले आहेत.


🖊 डॉ. नीलिमा गुंडी

nmgundi@gmail.com

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

दिनांक- १५सप्टेंबर २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...