बदली

Wednesday, 17 August 2022

वाक्प्रचार आणि व्यक्तिरेखा

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 वाक्प्रचार आणि व्यक्तिरेखा


काही वाक्प्रचार विशिष्ट व्यक्तिरेखांच्या संदर्भात असतात. त्या व्यक्ती प्रत्यक्षातील असतात किंवा कधीकधी पुराणकथांमधीलही असतात. त्याची काही उदाहरणे पाहू या.


*भगीरथ प्रयत्न करणे* या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, परिश्रम व चिकाटी यांच्या साहाय्याने लोकविलक्षण काम पूर्ण करणे. यात भगीरथाच्या जीवनकार्याचा थेट संदर्भ आहे. भगीरथ हा ईक्ष्वाकु वंशातील राजा होता. त्याने दीर्घ तपश्चर्या करून स्वर्गातील गंगा पृथ्वीतलावर आणली होती. आज आपण हा वाक्प्रचार वापरताना म्हणतो, की शिक्षणाची गंगा आपल्या समाजात तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महात्मा फुले यांनी अक्षरश: भगीरथ प्रयत्न केले .


*त्रिशंकू होणे* म्हणजे ना धड इकडे, ना धड तिकडे अशी स्थिती निर्माण होणे. यातील त्रिशंकूविषयी पुराणात गोष्ट आहे. त्रिशंकू राजा सदेह स्वर्गात गेला, तेव्हा देवांनी त्याला खाली लोटून दिले आणि विश्वामित्रांनी त्याला वर चढवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे तो अधांतरी लोंबकळत राहिला. त्रिशंकू होणे, या वाक्प्रचाराचा अनुभव घेण्यासाठी मुंबईच्या उपनगरी रेल्वेने गर्दीच्या वेळी एकदा प्रवास करून पाहावा!


*मल्लिनाथी करणे* म्हणजे टीका करणे होय. यात उल्लेख असलेला मल्लिनाथ चौदाव्या किंवा पंधराव्या शतकात होऊन गेला. कोलाचल मल्लिनाथ हे त्याचे नाव. काव्य, अलंकार, व्याकरण यात तो पारंगत होता. रघुवंश, मेघदूत, कुमारसंभव आदी कालिदासाच्या काव्यांवर त्यांनी केलेली संस्कृतमधील टीका प्रसिद्ध आहे. त्याला टीकाकार म्हणून प्रसिद्धी मिळाल्यामुळे ‘मल्लिनाथी’ हा शब्द ‘टीका’ याअर्थीच रूढ झाला! मात्र हा वाक्प्रचार साधारणत: उपरोधाने वापरला जातो. शेरेबाजी करणे, असा याचा अर्थ लक्षणेने घेतला जातो. उदा. घरात क्रिकेटचा सामना बघताना मल्लिनाथी करण्याचा मोह होत नाही, असा माणूस विरळा असेल!


असे आणखीही वाक्प्रचार आहेत. उदा. भीष्मप्रतिज्ञा करणे (दृढनिश्चय करणे), कर्णाचा अवतार (दानशूर), शकुनिमामा (कपटी), कळीचा नारद (भांडणे लावणारा). अशा प्रकारे काही व्यक्तींच्या स्वभावगुणांमुळे त्यांना प्रतीक म्हणून मान्यता मिळाली आहे आणि त्यातून भाषेत वेगवेगळे वाक्प्रचार रूढ झाले आहेत.


🖊डॉ. नीलिमा गुंडी

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

दिनांक- ऑगस्ट २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...