भाषासूत्र, दै.लोकसत्ता
🎯 हेल्याच्या कानी किंगरी
हेला म्हणजे रेडा. किंगरी नावाचे एक छोटय़ा आकाराचे वाद्य असते. रेडय़ाच्या कानात जर किंगरीसारखे लहान वाद्य वाजवले तर तो त्याला काहीच प्रतिसाद देत नाही. त्याच्या चालीत काहीच सुधारणा होत नाही. त्याप्रमाणेच मूर्ख माणसाला तुम्ही कितीही उपदेश केलात तरी त्याच्या वागणुकीत काहीही बदल होत नाही. ‘पालथ्या घडय़ावर पाणी’ म्हणतात ना, तशातली गत! काही काही व्यक्ती अशा असतात की त्यांना त्यांच्या हिताच्या चार गोष्टी कळणं तर सोडाच, पण कोणी सांगायला गेलं तरी त्यांना ते पटत नाही. त्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही.
त्यातलाच एक प्रमोद होता. त्याला जीव तोडून सगळे सांगत असत पण ते त्याच्या मनी उतरेल तर शपथ! त्याच्या कानातच काही शिरायचे नाही तर मनात काय शिरणार?
बरं, त्याच्या अवतीभोवती चांगल्या सुजाण व्यक्तीही होत्या. त्याचे वडील गावातले मोठे वकील होते. एक भाऊ मोठा धंदा सुरू करून फार मोठा उद्योगपती झाला होता. दुसरा भाऊ परदेशात उच्च शिक्षण घेऊन मोठा शास्त्रज्ञ झाला होता. जितक्या सौम्यपणे त्याला सांगता येईल तितक्या सौम्यपणे त्याचे मन न दुखावता त्याला सर्व जण सल्लेही देत होते. पण हा ‘हेला’ काही ऐकेल तर शपथ!
त्याची काही ऐकून घेण्याची तयारीच नसे. कितीही सांगा, कसेही सांगा हा रेडा अडूनच राहायचा. त्यामुळे त्याची प्रगती होईना, पैसा वाचेना. काळ पुढे जात होता आणि याची अधोगती काही थांबेना. शेवटी त्याच्या पुढे हात जोडून त्याचे वडील सर्वाना म्हणाले, ‘याला खूप सांगून बघितले. आता काही सांगण्यात अर्थ नाही.
गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता अशातली गत आहे.’ त्यांच्या म्हणण्याला मोठय़ा भावांनी दुजोरा दिला,‘ खरं आहे बाबा तुमचं ! आपलं सारं बोलणं म्हणजे हेल्याच्या कानी किंगरी वाजवत बसणे अशातली गत आहे झालं.’
🖊 डॉ. माधवी वैद्य
==============
संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव
दिनांक- ३० ऑगस्ट २०२२
No comments:
Post a Comment