बदली

Sunday, 10 July 2022

ष्ट कुठे आणि ष्ठ कुठे ?

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 ष्ट कुठे आणि ष्ठ कुठे ?


‘सध्या भर दुपारी जमिनीचा पृष्टभाग इतका तापतो, की त्यातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडत आहेत, असे वाटते.’ या वाक्यात चूक आहे ती पृष्टभाग या शब्दाची. पृष्ट भाग- समासातील हे दोन शब्द. पृष्ट (ष् +ट) असा शब्दच अस्तित्वात नाही! आपण अनेकदा ‘पृष्ठ’ या शब्दाचा उच्चार ‘पृष्ट’ असा चुकीचा करतो आणि लिहितानाही त्या चुकीच्या शब्दाची वाक्यात योजना करतो. ‘पृष्ठ’ हा संस्कृतातील, मराठी भाषेने स्वीकारलेला (काहीही बदल न करता) तत्सम शब्द आहे. त्याचा अर्थ आहे- सपाटी, वरचा भाग, पुस्तकाचे पान. (पाठ,मागचा भाग) असेही या शब्दाचे संस्कृतात अर्थ आहेत. पण मराठीत ‘वरचा भाग, पुस्तकाचे पान, पुढील भाग’ हे अर्थ रूढ आहेत. हा शब्द संस्कृत भाषेत नाम, नपुसकिलगी आहे. ‘या पुस्तकाची पृष्ठसंख्या दोनशे आहे,’ किंवा ‘हा शब्द या पुस्तकात पृष्ठ क्रमांक २५ वर पाहा.’ अशी वाक्ये आपण वापरतो. पण वरील वाक्यात हा शब्द ‘जमिनीवरील भाग’ अशा अर्थी योजिला आहे. तो शब्द पृष्टभाग असा नसून पृष्ठभाग (ष्ट नव्हे ष्ठ = ष् + ठ) असा आहे. संस्कृतात ‘पुष्ट’ हे विशेषण आहे. ‘पुष्ट’चा अर्थ आहे- पोसलेला, लठ्ठ, आपण क्वचित लठ्ठ याअर्थी ‘पुष्ट’ हा शब्द योजतो. मराठी ‘पुष्टी’(सं.पुष्टि) हा शब्द ‘दुजोरा’ या अर्थाने मराठीत रूढ आहे. हे लक्षात घ्यावे, की हा शब्द पुष्ट (प् +उ) आहे. पृष्ठ किंवा पृष्ट नाही. वरील वाक्य असे लिहायला हवे- ‘सध्या भर दुपारी जमिनीचा पृष्ठभाग इतका तापतो, की त्यातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडत आहेत, असे वाटते.’ कोणतीही भाषा बोलताना अशा प्रकारचे चुकीचे प्रयोग होतच असतात. पण बोलणे आणि लिहिणे यांत फरक आहे, याचे विवेचन मी माझ्या जानेवारी २०२२ च्या पहिल्या लेखात केलेच आहे. लेखन करताना मराठी भाषकांनी योग्य खबरदारी घ्यावी, ही विनंती.


आता काही शब्दांत ‘ष्ट’ किंवा ‘ष्ठ’ शेवटी असलेले शब्द-

ष्ट : स्पष्ट, रुष्ट, भ्रष्ट, दुष्ट, नष्ट, इष्ट, कष्ट, अष्ट, मिष्ट, दृष्ट-ष्टी, शिष्ट, विशिष्ट, उत्कृष्ट, छांदिष्ट, संपुष्ट, भ्रमिष्ट, चविष्ट इ.


ष्ठ :   श्रेष्ठ, ज्येष्ठ, विष्ठा, निष्ठा, प्रतिष्ठा, षष्ठी(सहावी), शुक्लकाष्ठ, शर्मिष्ठा, वरिष्ठ, तत्त्वनिष्ठ, कनिष्ठ, घनिष्ठ इ.


🖊 यास्मिन शेख

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

दिनांक- ११ जुलै २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...