जीवन वाट...
आयुष्य म्हणजे काय तर जगणं आणि मरणं यातलं अंतर.आयुष्य म्हणजे जीवन आणि मृत्यू यांना जोडणारा पूल.असं असलं तरी जीवन आणि मृत्यू मधील जे अंतर आहे तो काळ आपण कधी, कुठे, कसा घालवला-कंठला, हे ज्याचे त्याने अनुभवलेले असते.आयुष्याची ही पायवाट कोणाची खडतर तर कोणाची अगदीच सहज सोपी असते असं वाटतं....ते तसं वाटतं कारण आपण लांबून हे सर्व पहात असतो...माझ्यापेक्षा तो किती सुखी आहे असं कितीही म्हटलं तरी प्रत्येकाचं जीवनाचं गणित हे वेगळं असतं.प्रत्येकाचं दुःख वेगळं असतं. दुःखाची खोली ,तीव्रता वेगवेगळी असते.तरी आपआपल्या जीवन वाटा धुंडाळून वाटसरू चालत असतो.
![]() |
आयुष्याची पायवाट कितीही दीर्घ झाली तरी वाटसरू आलेला शीण घालवण्यासाठी अधून मधून कुठंतरी विसावा घेत असतो. कधी तो टेकतो विस्तीर्ण वृक्षाच्या छायेत.कधी हिरव्यागार आणि बहरलेल्या पठारावर.अशाच निर्मनुष्य ठिकाणी आपण कंठलेल्या आयुष्याची विविध रंगी बेरंगी मालिका सुरू होते मनात...आयुष्यातील नागमोडी वळणं आणि सरधोपट रस्ता यातील सोडवलेली जीवनाची गणितं तो पुन्हा पुन्हा आपल्या क्षीण नजरेने न्याहाळत असतो. जीवनाची काही गणितं सुटतात काही सोडून दिलेली असतात....सुटलेल्या - न सुटलेल्या आयुष्याच्या गणितांची गोळाबेरीज लावत बसतो स्थिर शून्य नजरेने.
कितीही जीवनात चांगले -वाईट वळणं आले असले तरी तो प्रवास त्याचा स्वत:च्या अनुभव विश्वाने डोळे आणि कान उघडे ठेवून केलेला असतो.असा प्रवास कितीतरी प्रसंगांनी रंगतदार झालेला असतो.कधीही न विसरले जाणारे असंख्य व्यक्तिमत्वाचे ठसे आपल्या मनावर उमटत गेलेले असतात.अनेक वादळांचा आवेग आपण अनुभवतो.अनेकवेळा जीवनाच्या चक्रव्युवात आपण अडकतो. आपण आपलीच सुटका करून घेतल्यानंतर आपण किती घाबरलो होतो हा विचार करून आपलेच आपल्याला नवल वाटते. अशा कितीतरी आठवणी जीवनवाटेवर येत असतात.आठवणींना कधी क्रम नसतो.आठवणी कधी अकस्मात कोसळणाऱ्या पावसागत असतात तर कधी एखाद्या बुडबुड्यागत सावकाश अलवार .आठवणी कधी खूप वेदनादायी असतात तर कधी सुखाची फुंकर घालणाऱ्या असतात.पण मजा अशी असते की आठवणी कालांतरानं आनंदच देणाऱ्या ठरतात.आयुष्याच्या प्रवासात आलेले अनुभव त्या त्या क्षणी अनुकूल किंवा प्रतिकूल असतात...पण कालांतरानं काळाच्या किमयेनुसार त्या आठवणी आनंदच देत असतात...
असंख्य वेळा आपण स्वप्नांच्या पाठी लागून सर्वदूर अगदी बेभानपणे चालत सुटतो.स्वप्नांची पालखी घेऊन आपण न थकता चालत राहतो. कदाचित स्वप्न पूर्ततेसाठी आपण सर्वदूर भरकटतो. वाटा चुकतो...तरीही त्याच ओढीनं आपण धावत असतो वेड्यागत......ठेचाळलो की आसवं जमतात डोळ्यात. मग वाटतं अरे ही तर आपली वाट नव्हेच मुळी.... अन आता खऱ्या अर्थाने मागचे मार्ग बंदिस्त होतात....मग उरतं फक्त पुढे पुढे सरकत जाणे...एवढंच आपल्या हाती असतं. मनासारखं नाही जगता आलं याची सल कायम अंतर्मनात राहते.अशा असंख्य वाटा खुणावत राहतात आजूबाजूला....आपण आपली वाट निवडायची आणि पुढं पुढं चालत राहायचं .....मागून येणाऱ्या वाटसरूला आयुष्याच्या वाटांचा अनुभव फक्त देत राहायचे बस्स....
संजय ग. मराठे
९४२१९७३८८८
उल्हासनगर 4

अप्रतीम शब्दरचना. वाचतांना , जीवंत झाडाच्या एखाद्या फांदीला बहरलेल्या वेलीने गुंफून टाकलं आहे....... असं मनाला हेलावून टाकतं. बस्स....!
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद
Delete