बदली

Tuesday, 26 April 2022

मांजर करी एकादशी...

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 मांजर करी एकादशी..


पार्वतीबाई आपले वजन कमी कसे होईल म्हणून खूप प्रयत्न करायच्या. त्यासाठी कोणी काही उपाय सुचवले तर त्याचे पालन करायला त्या नेहमीच अगदी एका पायावर तयार असत. मग कधी नुसत्याच उकडलेल्या भाज्या खा, कधी नुसतीच फळे खा, कधी मिठाचे सेवन वर्ज्य कर असे एक ना दोन, हजार प्रकार त्या करून बघत असत! पण वजनाचा काटा काही आशादायक आकडा दाखवायचाच नाही. वजन जसेच्या तस्से. कणभरही कमी होत नसे.


अहो, कसे कमी होणार? एकीकडे देवाधर्माच्या नावाने उपवास धरायचा अन् दुसरीकडे मात्र त्या उपवासाच्या नावाखाली जिभेचे भरपूर चोचले पुरवायचे; असेच व्हायचे पार्वतीबाईंचे. आठवडय़ातून तीन दिवस उपास! म्हणजे तीन दिवस ‘आहार नियंत्रण’ वगैरे कोलमडलेलेच असे. कारण तीन दिवस ‘एकादशी आणि दुप्पट खाशी’ या न्यायाने आहार घेतला जायचा. मग पदरी घोर निराशा पडणार दुसरे काय होणार? मग त्यांची आहारशास्त्रज्ञ त्यांना हात जोडून विनंती करायची, ‘‘अहो पार्वतीबाई! आता एक महत्त्वाचा सल्ला देते. अगदी लक्षात ठेवा. ‘मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी’ असं वागताय तुम्ही. असं केलंत तर तुमचं वजन कमी करण्याचं ध्येय तुम्ही कधीच साध्य करू शकणार नाही. असं करू नका असा माझा तुम्हाला कळकळीचा सल्ला आहे.’’ विचार केला तर आपल्याकडूनही अनेकदा असे वर्तन होत असते. कुशी म्हणजे पोट. उपवास करणे ही गोष्टच मांजरीच्या स्वभावाला न मानवणारी आहे. तिचा उपवास म्हणजे फक्त उंदीर मारून आपले पोट भरणे, असाच असणार. ‘लेकी बोले सुने लागे’ याप्रमाणे मांजरीचे उदाहरण देऊन माणसाच्या वर्तनावर मार्मिकपणे बोट ठेवणारी ही म्हण आहे. नाही का? म्हणींचे जे कोणी कर्ते असतील त्यांनी मानवी जीवन आणि त्यातील व्यवहार यांचे किती सूक्ष्म निरीक्षण केले असेल आणि ते सारे म्हणींच्या एका उक्तीत गोवले असेल!


🖊डॉ. माधवी वैद्य madhavivaidya@ymail.com

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

 दिनांक- २६ एप्रिल २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...