बदली

Friday, 22 April 2022

नट्टापट्टा

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 नट्टापट्टा


‘नट्टापट्टा’ हा शब्द मराठीत ‘मेकअप’ या इंग्रजी शब्दाला बराचसा समानार्थी म्हणून वापरला जातो. ‘नखरा’ हा मूळ अरबी शब्ददेखील साधारण त्याच अर्थाचा आहे. त्यात केशरचनेपासून भुवया कोरण्यापर्यंत आणि नखे रंगवण्यापासून उंची वेशभूषेपर्यंत अनेक गोष्टी येतात. स्नो-पावडर, काजळ, मस्कारा, रूज, लिपस्टिक, फेसपॅक इत्यादींचा त्यात समावेश होतो. पूर्वी मुख्यत: नाटक-सिनेमातील कलाकार नट्टापट्टा करत, पण अलीकडे मात्र साध्या वाढदिवसाच्या पार्टीपासून लग्नापर्यंत प्रत्येक कार्यक्रमात नट्टापट्टा हा अगदी अपरिहार्य भाग झाला आहे. त्यासाठी केला जाणारा खर्चही बराच असतो.

हा नट्टापट्टा शब्द आला कुठून? नट्टा हा शब्द बहुधा नटणे या शब्दावरून आला असावा आणि नादसाधम्र्य साधण्याच्या भाषिक लकबीमुळे त्याला पट्टा शब्दाची जोड मिळाली असावी. उदाहरणार्थ- चट्टेरीपट्टेरी किंवा चटकमटक हे शब्द. पण असे अनेक शब्द आहेत ज्यांची एकच एक अशी व्युत्पत्ती खात्रीपूर्वक सांगणे अवघड आहे.


नट्टापट्टा हा तसाच एक शब्द असावा. पूर्वी कोलकाता येथे अनेक वर्षे ग्रंथपाल असलेले आणि नंतर वडोदरा येथे स्थायिक झालेले श्री. बा. जोशी यांनी त्यांच्या ‘गंगाजळी’ या पुस्तकात नट्टापट्टा शब्दाची एक वेगळी आणि पटणारी व्युत्पत्ती सांगितली आहे. बळीराजाला मोहात पाडून पाताळात गाडण्यासाठी विष्णूने ५२ आठवडय़ांत ५२ रूपे घेतली, त्यामुळे तो पहिला बहुरूपी होता, असे बंगालमध्ये मानले जाते. तसे बहुरूपी आपल्याकडेही आढळतात पण बंगाली संस्कृतीत बहुरूपी हे पात्र अधिक महत्त्वाचे आहे. बहुरूपी हा एका अर्थाने नटच असतो. बंगालमधील बिरभूम, पुरुलिया वगैरे जिल्ह्यांत आजही अनेक बहुरूपी आढळतात. तारकेश्वर या तीर्थक्षेत्री किंवा कोलकाता येथील गंगेच्या घाटावर आणि हावडा ब्रिजवरदेखील ते दिसतात. विशेषत: होळी किंवा रामनवमीसारख्या सणांच्या वेळी!


प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक ऋत्विक घटक यांनी आपल्या १९६५ साली प्रदर्शित झालेल्या ‘सुवर्णरेखा’ या चित्रपटातून हे बंगाली बहुरूपी जगापुढे आणले. हे बहुरूपी भगवान विष्णूप्रमाणे वर्षांकाठी ५२ रूपे धारण करतात. त्या प्रत्येक रूपाला साजेसा मेकअप करण्यासाठी त्यांच्याकडे सर्व सामग्री असते व ती ठेवण्यासाठी एक मोठा पेटारा असतो. हल्लीच्या मेकअप बॉक्सचे किंवा व्हॅनिटी बॉक्सचे व्यापक स्वरूप! त्यासाठी बंगाली भाषेत नट-पीटक हा संस्कृतजन्य शब्द आहे. त्याच्यावरून नट्टापट्टा शब्द आला असावा, असे जोशी यांनी म्हटले आहे. बंगालमधील बिरभूम, पुरुलिया वगैरे जिल्ह्यांत आजही अनेक बहुरूपी आढळतात.


🖊भानू काळे bhanukale@gmail.com

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

 दिनांक- २२ एप्रिल २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...