बदली

Tuesday, 5 April 2022

आपलं आपलं ओळखलं आणि खिरीवर तूप झटकलं..

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 आपलं आपलं ओळखलं आणि खिरीवर तूप झटकलं..


क्षमा आणि प्रेमा दोघी सख्ख्या बहिणी, सख्ख्या जावाही होत्या. आता अशी चित्रे फारशी दिसत नाहीत. क्षमाच्या लग्नातच तिच्या दिराने प्रेमाशी लग्न करण्याची आपली इच्छा प्रकट केली आणि दोन्ही कुटुंबांना ती मान्यही झाली. पण जसजसे दिवस पुढे सरकू लागले तसतसा दोघी बहिणींच्या स्वभावातील फरक सगळय़ांच्या लक्षात येऊ लागला.

क्षमा दररोजच्या वागण्यात स्वत:च्या आणि प्रेमाच्या मुलांमध्ये आपपरभाव कधीच करीत नसे. आपली मुलं तशीच प्रेमाची मुलं म्हणून त्यांच्याकडेही तितक्याच प्रेमाने बघत असे. पण प्रेमाचे तसे नव्हते. आधी आपली मुलं आणि मग क्षमाची मुलं असा क्षमाच्या मुलांकडे बघण्याचा तिचा खाक्या होता. तसे तिचे हे वागणे सगळय़ांच्या लक्षात आलेले होते नाही असे नाही. पण कोणी काही फारसे न बोलता त्याकडे दुर्लक्ष करीत असत. पण मुले मोठी झाली आणि आजीजवळ रोज ती एकमेकांच्या तक्रारी करू लागली. ‘‘आजी! आज ना  काकूने आम्हाला एकच लाडू दिला. त्या दोघांना मात्र दोन दोन लाडू दिले.’’


आजी शहाणी होती. तिने दोघी बहिणींना बोलावले आणि त्या दोघींना समजावून सांगितले, ‘‘दोघी सुखाने एकत्र नांदाल असा आमचा कयास होता. पण दुर्दैवाने खोटा ठरला. वाटलं होतं, बहिणी बहिणी जावा झालात की हे सहजच जमून येईल. पण प्रेमा, तू निराशा केलीस. तू घरात वागताना आपपरभावाने वागते आहेस. तुझं वागणं म्हणजे ‘आपलं आपलं ओळखलं अन् खिरीवर तूप झटकलं’ असं आहे. तुझा स्वभाव काही बदलणार नाही. तुझ्या मुलांच्या पानात आपोआप दोन चमचे तूप जास्तच पडणार आणि तुझ्या पुतण्यांच्या पानात दुजाभावाने काही तरी कमीच वाढले जाणार! ही गोष्ट जास्त वाढीस लागायच्या आतच आपण थांबलेले बरे! असा विचार आम्ही केला आहे. दोघींनी दोन संसार मांडा आणि सुखाने राहा, असे आम्हाला वाटते आहे.’’


अखेर दोघींचे दोन संसार मांडले गेले आणि सर्वच सुखात नांदू लागले.


🖊डॉ. माधवी वैद्य madhavivaidya@ymail.com

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

 दिनांक- ५ एप्रिल २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...