भाषासूत्र, दै.लोकसत्ता
🎯 वाक्प्रचार जपतात इतिहासाच्या खुणा
काही वाक्प्रचारांमध्ये इतिहासाच्या खुणा दडलेल्या असतात. इतिहासातील व्यक्ती, वस्तू, घटना यांच्याभोवती ते वाक्प्रचार गुंफलेले असतात.
उदा. ‘कात्रजचा घाट दाखवणे’ हा वाक्प्रचार आपल्याला शिवाजी महाराजांच्या ‘गनिमी कावा’ या युद्धतंत्राची प्रचीती देतो. शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानच्या सैन्याची दिशाभूल करण्यासाठी योजलेली ही नामी युक्ती होती. शिवाजी महाराजांनी बैलांच्या शिंगांना पलिते बांधले आणि बैलांना कात्रजच्या दिशेने सोडून दिले. त्यामुळे खानचे सैन्य त्या दिशेने गेले आणि शिवाजी महाराज सिंहगडावर सुखरूप पोहोचू शकले! ‘कात्रजचा घाट दाखवणे’ म्हणजे दिशाभूल करणे, हा वाक्प्रचार त्यानंतर रूढ झाला.
‘गंगेत घोडे न्हाणे’, हा वाक्प्रचारही मराठय़ांच्या इतिहासातील एका रोमहर्षक पर्वाची आठवण करून देतो. ‘भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा’, असे आपण गाण्यातून ऐकलेले असते! वरील वाक्प्रचारात यमुनेऐवजी गंगा नदीचा उल्लेख आहे. त्याचा अर्थ असा की भीमानदीच्या प्रदेशातील घोडे उत्तरेकडे नेणे! पेशव्यांनी उत्तर हिंदूस्थानात अंमल बसवला होता, तो संदर्भ यामागे आहे. त्यातून हा वाक्प्रचार रूढ झाला. त्याचा भावार्थ आहे, विजयाचा मोठा पल्ला गाठणे, अचाट कामगिरी करणे! आजही मोठे काम होणे, भरून पावणे या अर्थाने हा वाक्प्रचार रूढ आहे.
‘नारो शंकराची घंटा’ या वाक्प्रचारामागेही असाच ऐतिहासिक संदर्भ आहे. नाशिकचे सरदार नारो शंकर राजेबहाद्दर यांनी नाशिकमध्ये रामेश्वर मंदिर बांधले होते. चिमाजीअप्पा पेशवे यांनी वसईच्या लढाईत जेव्हा पोर्तुगीजांच्या विरुद्ध मोठा पराक्रम गाजवला, तेव्हा त्यांनी त्याची आठवण म्हणून वसईच्या किल्ल्यातील चर्चमधील घंटा बरोबर आणल्या होत्या. त्यातील एक मोठी घंटा नाशिकच्या त्या मंदिरात आहे. तिचा आवाज मोठा असल्यामुळे ‘नारो शंकराची घंटा’ म्हणजे गाजावाजा करणे, असा अर्थ रूढ झाला. मात्र लक्षणेने या वाक्प्रचाराचा अर्थ होतो, भांडखोर, कजाग स्त्री! (हे अर्थातरणही लक्षात घेण्याजोगे आहे!)
असे आणखीही वाक्प्रचार आहेत! भाषा ही ‘सांस्कृतिक स्मृती’ कशी ठरते, याचा उलगडा असे वाक्प्रचार वाचताना होतो.
🖊डॉ. नीलिमा गुंडी nmgundi@gmail.com
==============
संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव
दिनांक- ९ मार्च २०२२
No comments:
Post a Comment