*भाषासूत्र, दै.लोकसत्ता*
🎯 *सांस्कृतिक धन*
मराठी भाषेला अनेक शतकांची समृद्ध परंपरा आहे. या समृद्धीमध्ये वाक्प्रचारांचा मोठा वाटा आहे. बोलणे हे भाषेचे मूळ रूप असते, त्यामुळे वाक्प्रचार हे एकप्रकारे आपले सांस्कृतिक धन आहे. वर्षांनुवर्षे प्रचारात असलेल्या वाक्प्रचारांमुळे बोलण्यातली सहजता आणि अर्थपूर्णता खुलते. वाक्प्रचारांत लयबद्धता आणि अलंकरणही आढळते. संक्षेप ही भाषेची मोठी शक्ती असते, हे वाक्प्रचारांमधून लक्षात येते. यामुळे वाक्प्रचारांविषयी अनेकांना मोठी उत्सुकता असते.
वाक्प्रचारांचा अर्थ उलगडताना भाषेच्या घडणीमागची काही रहस्ये उजेडात येत असतात. रामायण-महाभारत यातल्या गोष्टी, भाषा-भाषांमधले सांस्कृतिक आदानप्रदान, निसर्गसृष्टी, त्याचबरोबर कला, क्रीडा, इतिहास, धर्म, तत्त्वज्ञान असा समस्त जीवनव्यवहार यांतून विविध वाक्प्रचारांना संदर्भपूर्णता मिळालेली असते. बदलत्या परिस्थितीमुळे काही वाक्प्रचार विस्मरणात जमा होतात, कालबाह्य ठरलेले काही वाक्प्रचार दूर सारणे गरजेचेही असते; त्याचवेळी नवे वाक्प्रचार रूढही होत असतात! मुळात हे मौखिक धन असल्यामुळे कधी त्यात एखादा शब्द बदलतो, तर कधी त्यात अर्थातरणदेखील घडते!
मराठीत अनेक प्रकारचे कोश आहेत. त्यापैकी ‘महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश’ (संपादक यशवंत रामकृष्ण दाते, चिंतामण गणेश कर्वे ) या ग्रंथाचे दोन खंड म्हणजे भाषेसाठी महत्त्वाचे संदर्भसाधन आहे. यात शिष्ट व अशिष्ट अशा वाक्प्रचार व म्हणी यांचा समावेश आहे. संपादक म्हणतात की वाक्संप्रदायांचा एवढा मोठा कोश कोणत्याही भारतीय भाषेत नाही ! मान्यवर साहित्यिक अरुण खोपकर यांनी आपल्या ‘अनुनाद’ या पुस्तकात ‘महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश’ आणि फ्रेंच भाषेतील एक कोश यांच्यातील वाग्युद्धाची हकीकत रंगवून सांगितली आहे! भाषिक व्यवहार असा खुमासदार होण्यासाठी आपल्याही भात्यात अनेक वाक्प्रचार असायला हवेत!
भाषेविषयी अनेकांना ममत्व असते, कारण भाषा ही ‘सांस्कृतिक स्मृती’ मानली जाते. अनेक वाक्प्रचार वाचताना याची प्रचीती येते. कित्येक वाक्प्रचार सांस्कृतिक संचिताशी आपले नाते राखायला मदत करतात. काही वाक्प्रचारांमधून आपल्याला सामाजिक स्थित्यंतराचे पडसादही ऐकू येतात. हे सर्व जाणून घेण्यासाठी हा लेख लिहून मी सदराचा ओनामा केला आहे!
*🖊डॉ. नीलिमा गुंडी* nmgundi@gmail.com
==============
*संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव*
*दिनांक- ५ जाने २०२२*
No comments:
Post a Comment