बदली

Thursday, 3 March 2022

वाक्प्रचार आणि लष्करातील संज्ञा

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 वाक्प्रचार आणि लष्करातील संज्ञा


एकांडा शिलेदार म्हणजे धाडसी वृत्तीचा स्वतंत्र शिलेदार. पूर्वी लष्करात प्रत्येक पथकात किंवा पागेत १ ते १०० पर्यंत एकांडे शिलेदार असत. पानिपतच्या बखरीत हा शब्दप्रयोग आढळतो. एकांडा शिलेदार म्हणजे अनुयायी वा सैन्य, अशा कोणाचीही मदत न घेणारा वीर! त्याला वार्षिक वेतन रुपये ३०० ते दोन हजापर्यंत असे. एकांडा शिलेदार कोणत्याही सैन्यपथकात सामील नसे. उत्तम कामगिरी केली की त्याला क्वचित पालखी वा अबदागिरीचा मान मिळत असे. अत्यंत आणीबाणीच्या वेळी हा पुढे येत असे. पुढे या संज्ञेला व्यापक अर्थ मिळत गेला. कोणत्याही मदतीची अपेक्षा नसलेल्या, स्वतंत्र वृत्तीने कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तीसाठी आजही  हा वाक्प्रचार वापरला जातो. स्वतंत्र वृत्तीच्या धाडसी, कर्तृत्ववान व्यक्तीला हा वाक्प्रचार खरे तर एखाद्या बिरुदासारखा शोभतो! उदा. ‘डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी एकांडय़ा शिलेदाराप्रमाणे ज्ञानकोशाचे प्रचंड कार्य पूर्ण केले.’ पाचावर धारण बसणे, हा वाक्प्रचार आपण सहज वापरतो. पूर्वी लष्करात फार महागाई झाली की एका रुपयाला पाच शेर धान्य मिळू लागे! म्हणजेच ‘पाचावर धारण बसे’, तेव्हा लोक हवालदिल होत असत!  दाते, कर्वे यांच्या ‘महाराष्ट्र शब्दकोश’ या ग्रंथात ‘धारण’ या शब्दाचा अर्थ दिला आहे, तो असा : धान्य इत्यादीचा खरेदी-विक्रीचा चालू दर, बाजारभाव. भाऊसाहेबांच्या बखरीत हा शब्द आढळतो. एका लोकगीतातही हा शब्द येतो, तो असा : ‘पंढरपुरात काय, बुक्क्याची धारण / पुसे बंगल्यावरून, रखुमाबाई!’ धारण हा शब्द आज ऐकू येत नाही, म्हणून हे स्पष्टीकरण दिले! अन्न ही माणसाची मूलभूत गरज असल्यामुळे लोकांचे महागाईमुळे असे घाबरून जाणे, साहजिकच ठरते. त्यावरून ‘धारण आणि मरण काही समजत नाही’, अशी अनुप्रास जुळवत केलेली लोकोक्तीही आढळते!  त्यामुळेच ‘पाचावर धारण बसणे’ म्हणजे ‘अतिशय घाबरणे, हवालदिल होणे’ होय !


*🖊डॉ. नीलिमा गुंडी* nmgundi@gmail.com

==============

*संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव*

 *दिनांक- २ मार्च २०२२*

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...