भाषासूत्र, दै.लोकसत्ता
🎯 अपप्रयोगांची कला!
आता हे वाक्य वाचा- ‘तू तुझ्या मित्राच्या कलेने घे, त्यातच तुझा फायदा आहे’.
(या वाक्यातील कलेने या शब्दाचे मूळ रूप ‘कला’- विभक्तिप्रत्यय लागल्यास या स्त्रीिलगी एकवचनी नामाचे सामान्यरूप कलेने होईल. ‘कला’ या शब्दाचा अर्थ काव्य, गायन, शिल्प, चित्र, नृत्य, इ. कौशल्याची कामे.)
‘एखाद्याच्या कलेने घेणे’ या शब्दयोजनेमुळे वाक्याचा नेमका अर्थच कळत नाही.
मराठीत वाक्प्रचार हा आहे- एखाद्याच्या कलाने घेणे. अर्थ आहे- एखाद्याच्या बुद्धीचा स्वाभाविक रोख, त्याची प्रवृत्ती लक्षात घेऊन, त्याप्रमाणे वागणे. कल या पुल्लिगी, एकवचनी नामाचे अनेक अर्थ आहेत- ओढा, प्रवृत्ती, वळण, रोख, बुद्धीचा स्वाभाविक रोख.‘तू तुझ्या प्रवृत्तीपेक्षा मित्राची प्रवृत्ती लक्षात घेऊन त्याप्रमाणे वाग, त्यामुळे तुला फायदा होईल,’ असा त्या वाक्याचा अर्थ आहे. वरील वाक्य असे हवे- तू तुझ्या मित्राच्या कलाने घे, त्यातच तुझा फायदा आहे. ‘कलेने’ असा शब्द वाक्यात घेतल्यास मित्राच्या अंगी चित्र, संगीत, इ.पैकी एखादी कला आहे व त्या कलेने तू घे. हे वाक्य निर्थक ठरेल. लक्षात घ्या, एखाद्याच्या कलाने घेणे असा वाक्प्रचार आहे, एखाद्याच्या कलेने घेणे असा वाक्प्रचार नाही.
*पैकीच्या पैकी!*
आणखी एक वाक्य वाचा- ‘माझ्या मुलाला गणिताच्या पेपरात पैकीच्या पैकी गुण मिळाले’.
पैकी हे शब्दयोगी अव्यय आहे. त्याचा अर्थ आहे- आतले, मधून. पैकीच्या पैकी या शब्दयोजनेला काहीच अर्थ नाही. हे वाक्य असे हवे- ‘माझ्या मुलाला गणिताच्या पेपरात शंभरापैकी शंभर गुण मिळाले’ किंवा त्याला.. ‘सगळेच्या सगळे गुण मिळाले.’ मात्र ‘पैकीच्या पैकी’ हा अपप्रयोग इतका रूढ झाला आहे, की त्यात काही चूक आहे, हे आपल्याला जाणवत नाही!
*रुळलेले अपप्रयोग..*
‘सामग्री’ हा शब्द ‘सामुग्री’ असा बोलण्यात आणि लेखनातही आढळतो. ‘आशीर्वाद’ हा शब्द ‘आशिर्वाद’ असा लिहिणे चुकीचे आहे. तसेच, ‘महाराष्ट्रीयन’ हा शब्द ‘अमेरिकन’/ ‘युरोपियन’ या इंग्लिश शब्दाचे चुकीचे अनुकरण आहे. तो शब्द ‘महाराष्ट्रीय’ असा लिहिणे योग्य. सामग्री, आशीर्वाद, महाराष्ट्रीय असे शब्द लिहावेत.
*🖊 यास्मिन शेख*
==============
*संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव*
*दिनांक- २८ फेब्रु. २०२२*
No comments:
Post a Comment